Pune Crime News : दोन अट्टल सोनसाखळी चोरट्यांना अटक

अटक आरोपी नवरात्रोत्सवात पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सोनसाखळी हिसकाविण्याच्या तयारीत होते.

एमपीसी न्यूज – पुणे आणि पिंपरी – चिंचवडमध्ये नवरात्रोत्सवात सोन साखळ्या हिसकाविण्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांना खडक पोलिसांच्या पथकाने नाट्यमय पद्धतीने पकडले. त्यांच्याकडून 3 लाख 45 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.

सचिन नरहरी पेशवे (वय 36) आणि प्रेम शालीकराम खत्री (वय 29, दोघेही रा. येवलेवाडी, मूळ- नागपूर ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सोन साखळी, घरफोड्या, लूटमार करणाऱ्या गुन्हेगारांना आळा घालण्याच्या सूचना गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांना देण्यात आल्या होत्या. खडक पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांना सोनसाखळी चोरी करणारे सराईत गुन्हेगार खडीमशीन चौकातून ये-जा करीत असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार खडक पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून खडीमशीन चौकात सापळा रचला. त्यानंतर पहाटेच्या सुमारास दुचाकीवरुन आलेल्या सचिन व प्रेम या दोघांना पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी दुचाकी दामटून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी पोलिसांनी दुचाकीवर त्यांचा पाठलाग केला आणि काही अंतरावर त्यांना पकडले. चौकशीत त्यांनी शुक्रवार पेठे, यमुनानगर, निगडी, संभाजीनगर, चिंचवड परिसरातील जेष्ठ महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकाविल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 3 लाख 45 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

सचिन व प्रेम अट्टल गुन्हेगार आहेत. सचिनवर 39 गुन्हे दाखल आहेत. तर प्रेमवर 10 गुन्हे दाखल आहेत. सचिन हा नागपूर, अमरावती जिल्ह्यातील अट्टल सोन साखळी चोर आहे. दीड महिन्यांपुर्वी तो नागपूर सेंट्रल जेलमधून शिक्षा भोगून बाहेर आला आहे.

त्याचा साथीदार प्रेम खत्री हा नागपूर, मध्यप्रदेशमध्ये वाहनचोरी, घरफोडी गुन्ह्यात सराईत आरोपी आहे. 2015 साली तो नागपूर सेंट्रल जेल तोडून पळाला होता. त्यानंतर त्याला शोधून अटक करण्यात आली होती. चार महिन्यांपुर्वी तो कारागृहाबाहेर आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.