Pune News : बंदुकीत गोळ्या भरतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, पण…
एमपीसीन्यूज : एक अल्पवयीन मुलगा बंदुकीमध्ये गोळ्या भरतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत त्या व्हिडिओतील मुलाला शोधून काढले. आणि चौकशी केल्यानंतर समोर आले एक वेगळेच सत्य.
या व्हिडिओमध्ये असलेली बंदूक ही खेळण्यातील बंदूक होती. केवळ गंमत म्हणून या मुलाने हा व्हिडिओ काढला आणि आपल्या इंस्टाग्राम अकाउंटच्या स्टेटसमध्ये ठेवला होता.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात राहणाऱ्या 16 वर्षीय मुलाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. स्थानिक नागरिकांनी मात्र दहशत बसवण्यासाठी अशा प्रकारचे कृत्य केल्याचा आरोप केला होता.
पोलिसांपर्यंत हा व्हिडीओ गेल्यानंतर त्यांनी काही वेळातच या मुलाला शोधून काढले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने ही बंदूक खेळण्यातली असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी ही बंदुक स्वतः पाहिली आणि त्यानंतरच सुटकेचा नि:श्वास टाकला.
मागील काही दिवसांपासून पुणे शहर आणि जिल्ह्यात अशाप्रकारे हातात शस्त्र घेऊन त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा प्रकारचे काही व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी संबंधितांवर कारवाई सुद्धा केली आहे.
परंतु, आजचा हा प्रकारही सुरूवातीला गंभीर स्वरूपाचा वाटत होता. परंतु, पोलिसांनी चौकशी केल्यानंतर वायरल झालेली बंदूक खेळण्यातली बंदूक निघाली आणि त्यानंतर पोलिसांचा सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.