Pune Crime News : पुण्यात सराईत गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेत कोरोना नियमांची ऐशीतैशी, मोठ्या संख्येने गर्दी, दुचाकी रॅलीही काढली

एमपीसी न्यूज – पुण्यातील बिबेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री माधव वाघाटे या सराईत गुन्हेगाराचा निर्घृण  खून करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल करीत काही आरोपींना अटक केली आहे. याच गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेत आता कोरोना नियमांना पायदळी तुडवली असल्याचे समोर आले आहे.

या अंत्ययात्रेचा एक व्हिडीओ समोर आला असून मोठ्या संख्येने या तडीपार गुंडाचे समर्थक अंत्ययात्रेत जमा झाले असल्याचे या व्हिडिओ मध्ये दिसत आहे. इतकेच नाही तर या गुंडाच्या समर्थकांनी अंत्ययात्रेदरम्यान रॅली काढली असल्याचेही स्पष्ट झाले आहे. या संपूर्ण प्रकाराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मैदानात दहा जणांच्या टोळक्याने शुक्रवारी रात्री माधव वाघाटे या सराईत गुन्हेगाराचा दगडाने ठेचून आणि लाकडाने मारहाण करून खून केला होता. शनिवारी दुपारी माधव वाघाटे याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर आमचे संस्कारासाठी केवळ 25 नागरिकांनाच परवानगी देण्यात आली आहे. परंतु असे असतानाही इतक्या मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झालेच कसे असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

शनिवारी आणि रविवारी पुणे शहरात कडक निर्बंध लागू आहेत. शहरातील चौकाचौकात पोलिसांची नाकाबंदी आहे. असे असतानाही इतक्या मोठ्या संख्येने नागरिक एकत्र जमत असताना पोलिसांना समजले नाही का असा प्रश्न नागरिक विचारत असून त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.