Pune Crime News : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून शस्त्रसाठा जप्त

0

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असतानाच स्थानिक गुन्हे शाखेच्या पाेलिसांनी पुणे-नाशिक महामार्गावर खेड येथून शस्त्रसाठा जप्त केला आहे. येथील बस स्थानकावर थांबलेल्या दाेघांना पाेलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याकडून एक लाख 75 हजार रुपये किंमतीची चार पिस्टल आणि आठ काडतुसे जप्त केली आहेत.

याप्रकरणी प्रवीण सीताराम ओव्हाळ (वय-28,रा. वाळद, ता.खेड, पुणे), निलेश राजेंद्र वांझरे (24,रा. वांझरवाडी, ता. दाैंड,पुणे) या आराेपींना अटक करण्यात आली आहे. सध्या सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुक सुरु असून बुधवारी रात्री प्रचार संपून शुक्रवारच्या मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. काेणताही अनूचित प्रकार घडू नये याकरिता पाेलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी पाेलिसांना सूचना दिल्या असून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक विविध भागात पेट्राेलिंग करत आहेत.

खेड भागात पोलीस कर्मचारी पेट्राेलिंग करत असताना, खेड बसस्थानकावर दाेन जण पिस्तुल विक्रीस येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पाेलिसांनी बस स्थानकात पाेहचून संशयितांची पाहणी सुरु केली असता दाेन संशयित इसम मिळून आले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे कमरेला प्रत्येकी दाेन पिस्तुल मिळून आले. त्यामुळे पाेलिसांनी दाेघा आराेपींना अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.