Pune Crime News : मास्क न घालता रिक्षाचालकाची पोलिसांसोबत हुज्जत, ठोसाही लगावला

एमपीसीन्यूज : विना मास्क रिक्षा चालवणाऱ्या रिक्षाचालकाला दंड भरण्यास सांगितल्याने रागावलेल्या रिक्षाचालकाने पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार पुणे स्टेशन परिसरात घडला.

रिक्षाचालक अल्ताफ शेख (वय ४७,रा. येरवडा) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हवालदार तानाजी शिवाजी आडके यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस हवालदार तानाजी आडके पुणे स्टेशन परिसरात विनामास्क फिरणा-या नागरिकांवर कारवाई करत होते. त्यावेळी रिक्षाचालक शेख तोंडाला मास्क न लावता प्रवाशांची ने-आण करण्यासाठी ओरडत होता. त्यावेळी तानाजी यांनी त्याला मास्कची विचारणा केली. त्यानंतर तडजोड शुल्काची पावती करण्यास सांगितले.

मात्र, आरोपी शेखने दंडात्मक पावती करण्यास नकार देत तानाजी आडके यांच्यासोबत वाद घातला. त्यांना पोटात ठोसा मारून धक्का देत सरकारी कामात अडथळा निर्माण केला.

पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक फड करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.