Pune Crime News : जिल्हाधिकारी असल्याचे भासवून फसवणूक करणारी महिला जेरबंद

एमपीसी न्यूज – जिल्हाधिकारी असल्याचे भासवून नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून आणि इतर कामे करून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या महिलेला पोलिसांनी जेरबंद केले आहे. अनिता देवानंद भिसे (वय 46) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी महिला येरवडा परिसरातील प्रतीकनगर सोसायटीत भाड्याच्या घरात राहत होती. राहत असलेल्या सोसायटीत तिने आपण जिल्हाधिकारी असल्याचे सोसायटीतील इतर नागरिकांना सांगितले होते. यातूनच तिची शेजारी राहणाऱ्या दुर्गेश्वरी चित्तर या महिलेसोबत ओळख झाली होती. ही ओळख वाढवत तिने चित्तर दाम्पत्याला अल्प दरात भूखंड मिळवून देते असे सांगितले. यासाठी त्यांच्याकडून वेळोवेळी 27 लाख 50 हजार रुपये उकळले होते.

दरम्यान इतके पैसे दिल्यानंतरही भूखंड मिळत नाही म्हटल्यानंतर संबंधित दांपत्याने या महिलेकडे पैसे परत देण्याची मागणी केली. यानंतर तिने या दांपत्याला उत्तर देत टाळण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकारानंतर या दांपत्याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि त्यांनी येरवडा पोलीस स्टेशन गाठत संबंधित महिलेविरोधात तक्रार दिली.

येरवडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत या महिलेला अटक केली. पोलिसांनी केलेला अधिक तपासात तिने अनेकांना गंडा घातल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तिच्या घराची झडती घेतली. तिच्या घरातून बनावट शासकीय शिक्के, कागदपत्रे जप्त करण्यात आले आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख, गुन्हे शाखेतील निरीक्षक अजय वाघमारे, सहाय्यक निरीक्षक समीर करपे यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.