Pune Crime News : लक्ष्मी रस्त्यावरील ज्वेलर्स मधून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या कामगाराला अटक

कर्ज फेडण्यासाठी सराफा दुकानातून कामगारानेच चोरले 9 लाखाचे दागिने

एमपीसी न्यूज – लक्ष्मी रस्त्यावरील प्रसिद्ध नीलकंठ ज्वेलर्स या सोन्या चांदीच्या दुकानातील दागिन्यांची चोरी करणाऱ्या कामगाराला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्याने चोरलेले नऊ लाख 59 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने ही पोलिसांनी जप्त केले. राजेंद्र उर्फ बापु तुकाराम साळुंखे (वय 39) असे आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, नीलकंठ ज्वेलर्स या सोन्या-चांदीच्या दुकानात 14 फेब्रुवारीच्या रात्री दिवसभर विक्री झालेल्या व शिल्लक राहिलेल्या दागिन्यांचा ताळेबंद करत असताना 9 लाख 59 हजार रुपये किमतीचे दागिने कमी असल्याचे आढळून आले. त्यानंतर दुकानातील सर्व कामगारांकडे विचारपूस केली असता कोणाकडूनही उपयुक्त माहिती मिळाली नाही. त्यानंतर साहिब दयालसिंग दिलबाग सिंग बीर (वय 37) यांनी अज्ञात कामगार विरोधात तक्रार दिल्यानंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान गुन्हे शाखेचे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असताना दुकानातील कामगारांकडे त्यांनी चौकशी केली. चौकशी दरम्यान कामगार राजेंद्र उर्फ बापू तुकाराम साळुंखे हा उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे देऊ लागला. त्याच्याविषयी पोलिसांना संशय आल्यानंतर पोलिसांनी त्याला गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणून पुन्हा चौकशी केली असता त्याने माहिती देण्यास नकार दिला. परंतु पोलिसांना चोरी त्यानेच केल्याचा संशय होता. त्यामुळे अटक करून त्याची पोलीस कोठडी घेतली.

पोलीस कोठडीत केलेल्या अधिक चौकशीत त्याने चोरी केल्याची कबुली दिली. तसेच घरात लपवून ठेवलेले दागिने काढून दिले. कर्ज झाले होते म्हणून ते फेडण्यासाठी त्याने चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.