Pune Crime News : लकी ड्रॉ मध्ये आयफोन गिफ्ट लागल्याचे भासवून तरुणाची सात लाखांनी फसवणूक

एमपीसीन्यूज : लकी ड्रॉ मध्ये आयफोन गिफ्ट लागल्याची भासवून सातजणांनी तरुणाला तब्बल 7 लाख 25 हजारांचा गंडा घातला. ही घटना हडपसरमधील काळेपडळमध्ये घडली.

याप्रकरणी मुहमंद जुबरील, सरस्वती, सुप्रिया, रॉबर्ट लालदित्सक, सूरज शर्मा, संजय चव्हाण, कृष्णा नकाशा यांच्याविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम मोहन भापकर (वय २३) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम हडपसरमधील काळेपडळ येथे कुटूंबियासह राहतात. काही महिन्यांपुर्वी आरोपी मुहमंद याने शुभमला मेसेज करुन आयफोन फोन लागल्याची बतावणी केली. त्यानंतर त्याने स्वतःची गॅझेट लिमीटेड कंपनी असल्याचे शुभमला सांगितले. मुहमंदने संबंधित कंपनीचे कागदपत्रे शुभमच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविले.

त्यामुळे विश्वास बसल्याने शुभमने पहिल्यांदा 20 हजार रुपये संबंधिताच्या बँक खात्यात वर्ग केले. त्यानंतर सातजणांनी वेळोवेळी शुभमला संपर्क करुन फोन कस्टममध्ये अडकल्याची माहिती देत रक्कम उकळली.

पैसे नसतानाही शुभमने मित्रांकडून उसने घेत संबंधितांच्या बँकखात्यावर वर्ग केले. सातत्याने पैशांची मागणी वाढल्यामुळे शुभमला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.