Pune Crime News : व्हाट्सअ‍ॅप स्टेटसवर तरुणाची ‘भाईगिरी’, पोलिसी खाक्या दाखवताच काही तासात वठणीवर

 

एमपीसी न्यूज – “एका एकाच्या डोक्यात कोयते अडकवणार” म्हणत व्हाट्सअ‍ॅप स्टेटसवर भाईगिरी करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांन चांगलीच अद्दल घडवली. व्हाट्सअ‍ॅप स्टेटस व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासात या तरुणाला बेड्या ठोकत त्याचे भाईगिरीचे भूत उतरवले.

अनिकेत विकास साठे (वय 20, रा. चंदननगर) असे या तरुणाचे नाव आहे. चंदननगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, “एका एकाच्या डोक्‍यात कोयते अडकवणार” असे म्हणत दहशत पसरवणारा तरुणांच्या टोळक्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. गुन्हे शाखेच्या पोलिसांना हा व्हिडीओ अनिकेत साठे याने तयार करून व्हाट्सअ‍ॅप स्टेटस ठेवला असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी चंदननगर परिसरातुन त्याला ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता केवळ फुशारक्या मारण्यासाठी त्याने हा व्हिडिओ तयार केला असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करीत त्याला बेड्या ठोकल्या.

शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का कारवाईचा बडगा उगारत अनेक टोळ्यांची रवानगी तुरुंगात केली. परंतु सोशल मीडियावर दहशत पसरवणारे व्हिडीओ पोस्ट करून ऑनलाइन भाईगिरी करणार्‍यांवर देखील पुणे पोलिसांची करडी नजर असल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.