Pune Crime News : भर रस्त्यात झोमॅटो बॉयवर वार करत दुचाकी चोरून नेली

एमपीसी न्यूज – खाद्यपदार्थांची डिलीव्हरी देऊन परत निघालेल्या झोमॅटो बॉयला तीन जणांच्या टोळक्याने भर रस्त्यात अडवून मानेवर चाकूने वार करत त्याची दुचाकी चोरुन नेल्याचा प्रकार घडला आहे.

लोहगाव येथील फॉरेस्ट रस्त्यावर शनिवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी कमलेश पांडे (वय 32,रा. लोहगाव) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे झोमॅटोमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. शनिवारी रात्री ते लोहगाव परिसरात पार्सल ऑर्डर देऊन परत घरी जात असताना एअर फोर्सच्या भिंती जवळील फॉरेस्ट पार्क येथे दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी त्याला अडविले. तसेच मानेवर चाकूने वार करत 20 हजार रुपयांची दुचाकी जबरदस्तीने चोरून नगर रोडने पळ काढला आहे.

चोरटे निघून गेल्यानंतर फिर्यादीने पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. परंतु चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले. विमानतळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक कापुरे अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.