Pune Crime News : घरफोडीसह वाहनचोरी करणारा सराईत अटकेत, गुन्हे शाखेच्या युनीट पाचची कामगिरी

एमपीसीन्यूज ; नवीन लग्न झाल्यामुळे पत्नीला खुश करण्यासाठी एका सराईताने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांतून साड्यांची चोरी केली. त्यानंतर तिला मित्राचे साड्यांचे दुकान असल्याचे सांगत ३० हून अधिक साड्या गिफ्ट केल्या. त्याशिवाय बायकोला खूश करण्यासाठी त्याने ड्रेसचीही चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. अशा प्रक्रारे शहरातील विविध भागात घरफोडी आणि वाहनचोरी करणा-या या सराईताला गुन्हे शाखेच्या युनीट पाचने अटक केले.

त्याच्याकडून दोन मोटारी, एक दुचाकी, १८ मोबाईल, ३ लॅपटॉप, ३० साड्या, १२ ड्रेस मिळून १३ लाख ४० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

रोहन बिरू सोनटक्के (वय २१, रा. वारजे माळवाडी) असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे.

गुन्हे शाखेचे पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना सराईत वाहनचोर मोबाइल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार महेश वाघमारे आणि प्रवीण काळभोर यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून रोहनला ताब्यात घेतले.

चौकशीत त्याने शहरातील विविध भागात घरफोडी आणि वाहनचोरी केल्याची कबुली दिली. त्याशिवाय नवीनच लग्न झाल्यामुळे पत्नीला खूश करण्यासाठी तो चोरी करीत असल्याची कबुली दिली. रस्त्याच्या कडेला वाहने थांबवून झोपलेल्या चालकाची नजर चुकवून कटावणीच्या साह्याने रोहन साड्यांची चोरी करीत होता.

रोहन सराईत गुन्हेगार असून त्याने केलेले 9 गुन्हे उघडकीस आणण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, राजेंद्र भोरडे, अश्रुबा मोराळे, दत्तात्रय ठोंबरे, अजय गायकवाड, चेतन चव्हाण, विशाल भिलारे, विलास खंदारे, संजय दळवी महेश वाघमारे, प्रवीण काळभोर, दाउद सय्यद यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.