Yerawada Crime News : तरुणीला पाहताच ‘आय लव यू’ म्हणत त्याने हातावर चाकू मारला

एमपीसीन्यूज : सध्या व्हॅलेंटाईन विक सुरू आहे, त्यामुळे महाविद्यालयं गजबजली आहेत. तरुण, तरुणी मोठ्या उत्साहात व्हॅलेंटाईन आठवडा साजरा करताना दिसतायत. दरम्यान, येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मात्र एक वेगळाच प्रकार उघडकीस आला. महाविद्यालयीन तरुणीच्या एकतर्फी प्रेमात पडलेल्या तरुणाने या तरुणीला ‘आय लव यू’ म्हणत स्वतःचा हात कापून घेतला.

येरवडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून इस्माईल रियाज शेख (वय 21) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत 18 वर्षीय तरुणीने याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी आणि आरोपी एकाच परिसरात राहतात. फिर्यादी महाविद्यालयात शिक्षण घेते तर आरोपी काहीही कामधंदा करीत नाही. तो नेहमी या तरुणीचा पाठलाग करून त्रास देत असे.

दरम्यान, गुरुवारी सकाळी फिर्यादी तरुणी महाविद्यालयात जाण्यासाठी बस स्टॉपवर थांबली असता आरोपी त्याठिकाणी आला. त्याने तिला ‘आय लव्ह यू म्हटले. परंतु, तिने काहीच प्रतिसाद दिला नाही. यामुळे इस्माईल याने हातावर सुरा मारून हात कापून घेतला. या घटनेत त्याला किरकोळ जखम झाली आहे.

अधिक तपास येरवडा पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.