Pune Crime News : चोरीच्या उद्देशाने खून केल्याप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा

एमपीसीन्यूज : सोन्याचा गोफ चोरी करण्याच्या उद्देशाने खून करणाऱ्याला जन्मठेप आणि 10 हजार रुपये दंड, तर ते सोने गहाण ठेवण्यास मदत करणाऱ्याला दोन वर्ष कारावास आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायधीश एस. एच. ग्वालानी यांनी सुनावली.

अश्रूकांत दादाराव कांबळे (रा. घोटावङे, ता. मुळशी,पुणे) याला जन्मठेप, तर चेतन कृष्णदास गुजर यास दोन वर्ष कारावासाची शिक्षा झाली. शकंर ज्ञानेश्‍वर धुमाळ यांच्या खून प्रकरणात ही शिक्षा झाली आहे.

या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी काम पाहिले. त्यांनी सतरा साक्षीदार तपासले.

त्यापैकी आरोपींनी सोने गहाण ठेवलेल्या फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयीन कामकाजासाठी पौङ पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल विजय चौधरी यांनी मदत केली. पोलीस निरीक्षक विश्‍वभंर गोल्डे यांनी या प्रकरणाचा तपास केला.

4 सप्टेंबर 2015 रोजी मुळशी तालुक्‍यातील घोटावडे, केळकर मळा येथील बैलगाड्यांच्या घाटाजवळ ही घटना घडली. आरोपींनी धारदार हत्याराने वार करून खून करून धुमाळ यांच्या गळ्यातील बारा तोळे वजनाचा सोन्याचा गोफ चोरी केला होता.

त्यामधील अर्धा गोफचा तुकङा, कांबळे याने त्याचा मित्र चेतन कृष्णादास गुजर याचे मदतीने 5 सप्टेंबर 2015 रोजी एका फायनान्स कंपनीत गहाण ठेवून 59 हजार 400 रुपये घेतले होते. या प्रकरणात पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले.

यावर युक्तीवाद करत अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.