Pune Crime News : लॉकडाऊनमध्ये सुरू असणाऱ्या पार्टीवर पुणे पोलिसांचा छापा; पाच मुलींची सुटका, नऊ जणांना अटक

एमपीसीन्यूज : लॉकडाऊनमुळे एकत्र येण्यास बंदी असतानाही पार्टी करणाऱ्या नऊ जणांना पुणे पोलिसांनी अटक केली. तर या ठिकाणाहून पाच तरुणींची सुटका देखील करण्यात आली. उत्तमनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या कुडजे गावातील एका फार्महाऊसवर ही पार्टी सुरु होती. याठिकाणी अवैधरीत्या वेश्या व्यवसाय देखील सुरू होता. बुधवारी मध्यरात्री उत्तमनगर पोलिसांनी ही कारवाई केली.

या पार्टीसाठी मुंबईहून डान्सर तरुणींना घेऊन आलेल्या प्राजक्ता मुकुंद जाधव (वय 26) या तरुणीसह मंगेश राजेंद्र सहाने (वय 32), निखिल सुनिल पवार (वय 33), ध्वनित समीर राजपूत (वय 25), सुजित किरण अंबवले (वय 34), निलेश उत्तमराव बोर्धे (वय 29), आदित्य संजय मदने (वय 24), समीर उर्फ निकेश दिलीप पायगुडे (वय 39) आणि विवेकानंद विष्णू बडे (वय 42) यांना अटक करण्यात आली.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, कुडजे गावातील लबडे फार्महाऊसवर पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर उत्तमनगर पोलिसांच्या एका पथकाने मंगळवारी मध्यरात्री या ठिकाणी छापा मारला. यावेळी त्यांना काही तरुणी डीजेच्या तालावर नाचत असताना दिसले. तर त्या ठिकाणी असणारे पुरुष मद्यप्राशन करताना आढळून आले. या फार्म हाऊसची झडती घेतली असता याठिकाणी बेकायदेशीररित्या वेश्याव्यवसायही सुरू असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी या ठिकाणाहून दारूच्या बाटल्या, डीजे सिस्टीम, रोख रक्कम व इतर साहित्य जप्त केले आहे.

या फार्म हाऊसचे व्यवस्थापक समीर उर्फ निकेश दिलीप पायगुडे आणि विवेकानंद विष्णू बडे यांनी या पार्टीचे आयोजन केले होते. आरोपी प्राजक्ता मुकुंद जाधव ही डान्सर मुली घेऊन या ठिकाणी आली होती. या सर्वांना आज कोर्टात हजर केले असता कोर्टाने तीन मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.