Pune Crime : एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या घरासमोर तरुणाचा गोंधळ

एमपीसी न्यूज – एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या घरासमोर फिल्मी गाणे म्हणत तिला साद घालणाऱ्या एका तरुणाला खडक पोलिसांनी अटक केली. शोहेब तांबोळी (वय 21) असे या तरुणाचे नाव आहे.

खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मीठ गंज पोलीस चौकी जवळ हा प्रकार घडला. 20 वर्षीय तरुणीने याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण हा फिर्यादी तरुणीच्या एकतर्फी प्रेमात होता. ती जाईल तिथे तिचा तो पाठलाग करत असे. फिर्यादी तरुणी शिकवणीला जात असतानाही त्याने तिचा रस्ता अडवून लग्नाची मागणी घातली होती. परंतु तिने त्याला दाद दिली नाही.

कोणत्याही प्रकारे सांगून ही तरुणी ऐकत नसल्याचे पाहून एकतर्फी प्रेमातून या तरुणाने तिचे घर गाठले. तिच्या घरासमोर मोठ्या आवाजात हिंदी चित्रपटातील प्रेमगीत म्हणतात तिला साद घालण्यास सुरुवात केली. परंतु तरीही ही तरुणी बधली नाही. त्याने गाणे म्हणता म्हणता अश्लील हावभाव करण्यासही सुरुवात केली. मग मात्र या तरुणीने मागेपुढे न पाहता पोलिसांना त्याची माहिती दिली. खडक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत या तरुणाला ताब्यात घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.