Pune Crime : संपत्तीच्या वादातून मुलाचा वडिलांवर चाकूहल्ला तर सासूला दांडक्याने मारहाण

एमपीसी न्यूज – संपत्तीच्या वादातून मुलाने वडिलांवर चाकूहल्ला करुन जखमी केले. त्यानंतर सुनेने सासूला दांडक्याने मारहाण करून जखमी केले आहे. ही घटना दोन दिवसांपुर्वी रात्री पावणेदहाच्या सुमारास खडकीतील गवळीवाडी जुनी तालीमशेजारी घडली.

कपिल पुरणचंद आहेर (वय ३६) आणि निशा कपिल आहेर (वय ३०) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पुरणचंद आहेर (वय ६८, रा. खडकी ) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आहेर कुटुंबीय खडकीतील गवळीवाडी जुनी तालिम परिसरात राहायला आहेत. काही महिन्यांपासून मुलगा कपिल आणि वडिल पुरणचंद यांच्यात संपत्तीवरून वाद आहेत.

दरम्यान, आहेर यांच्या राहत्या घराशेजारी कडबाकुट्टी कापणी मशीन असून त्याठिकाणी पुरणचंद यांना गाईचा गोठा करायचा होता. त्यासाठी त्यांनी खडकी कँन्टोन्मेंट बोर्डाकडे कापणी मशीन काढण्यासाठी अर्ज केला होता. त्याची माहिती कपिलला मिळाल्यामुळे त्याने वडिलांवर चाकूूहल्ला करून जखमी केले. त्याशिवाय निशा यांनी पुरणचंद यांच्या पत्नीला दांडक्याने मारहाण करून जखमी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.