Pune Crime : बेटिंगचे पैसे परत न केल्याने दोघांनी केली तरुणाची हत्या; दोघांना अटक

एमपीसी न्यूज : क्रिकेट सट्टेबाजीसाठी (Pune Crime) दिलेले पैसे परत न केल्याने दोन गुंडांनी 32 वर्षीय तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण करत हत्या केल्याची घटना आंबेगाव येथे घडली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी विशाल आमराळे (वय 35) आणि लहू माने (वय 40) या दोन बुकींना अटक केली आहे. तर, निखिल उर्फ ​​संकेत चंद्रशेखर अनभुले (वय 32, आंबेगाव बुद्रुक) असे मृत तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी हर्षदा निखिल अनभुले (वय 24, आंबेगाव बुद्रुक) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. ही घटना 15 नोव्हेंबर रोजी रात्री ते 16 नोव्हेंबरच्या सकाळी फ्लाइंग बर्ड स्कूल आंबेगाव ते बिबवेवाडीच्या बाजारपेठ दरम्यान घडली.

पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, निखिल अनभुले याने विशाल अमराळे (Pune Crime) याच्याकडून 28 हजार रुपये घेतले होते. ते परत करण्यासाठी अमराळे त्याला वारंवार फोन करून आपली गुन्हेगारी प्रतिमा सांगून धमक्या देत ​​होता. असे असतानाही निखिलने पैसे परत केले नाहीत. त्यामुळे 15 नोव्हेंबर रोजी निखिलला आंबेगाव येथील फ्लाइंग बर्ड स्कूलमध्ये बोलावण्यात आले. येथे अमराळे व त्याच्या साथीदारांनी त्याचे अपहरण करून केके मार्केटमध्ये आणून त्याला डांबून ठेवले.

Crime news : बांधकामाच्या प्लास्टरचा राडारोडा पडला म्हणून शेजाऱ्याकडून कुटुंबाला मारहाण 

निखिलची पत्नी हर्षदा हिने दिलेल्या तक्रारीनुसार, 16 नोव्हेंबरच्या पहाटे हर्षदाला निखिलचा फोन आला. ज्यामध्ये त्याने सांगितले, की काही लोकांनी त्याचे अपहरण केले आहे आणि त्याला कोंडून ठेवले आहे. जोपर्यंत तो त्यांच्याकडून घेतलेली रक्कम देत नाही, तोपर्यंत ते त्याला सोडणार नाहीत. निखिलच्या मित्राने हर्षदाला सांगितले की, तिच्या पतीला 15 नोव्हेंबरच्या रात्री आंबेगाव परिसरातून काही व्यक्तींनी कारमधून पळवून नेले. काही वेळाने कुटुंबातील सदस्यांनी ऑनलाइन बँकिंग ऍप्लिकेशनद्वारे निखिलच्या खात्यात 28000 रुपये ट्रान्सफर केले. काही वेळाने निखिल घरी परतला आणि अचानक जमिनीवर कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

निखिलच्या पाठीवर आणि छातीवर जोरदार वार करून त्याला जखमी करण्यात आले होते. आणि यामुळेच त्याचा मृत्यू झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालात समोर आले आहे. या अहवालानुसार, पोलिसांनी निखिलवर प्राणघातक हल्ला झाल्याचे म्हंटले आहे. पोलिसांनी विशाल आमराळे आणि लहू माने याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.