Pune Crime Update : आर्मीची पदके, सन्मानचिन्हांसह तोतया आर्मी ऑफिसर स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

Pune Crime Update: Local Crime Branch arrests bogus Army officer from Daund taluka with Army medals आपण भारतीय लष्करी सेवेत 14 वर्षांपासून असून विशेष प्रशिक्षण घेतल्यानंतर मिळणारी पदके व सन्मानचिन्ह देखील आपल्याकडे असल्याचे तो सांगत असे.

एमपीसी न्यूज – पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका तोतया आर्मी ऑफिसरला अटक केली आहे. हा तोतया आपण भारतीय लष्करी सेवेत 14 वर्षांपासून असून विशेष प्रशिक्षण घेतल्यानंतर मिळणारी पदके व सन्मानचिन्ह देखील आपल्याकडे असल्याचे सांगत असे.

प्रशांत विजय काळे उर्फ रोबोस्ट आण्णा (वय 27, रा. खडकी, ता. दौंड) असे अटक केलेल्या तोतया आर्मी ऑफिसरचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार सचिन मोहन गायकवाड यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्याच्यावर भारतीय दंड विधान कलम 419,170, 465 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांना माहिती मिळाली की, भारतीय लष्करात कोणत्याही पदावर नेमणुकीस नसतानाही दौंड तालुक्यातील खडकी गावातील प्रशांत विजय काळे नावाचा तरुण तो भारतीय लष्करात 14 सिख रेजिमेंटचा मेजर असल्याची बतावणी करीत आहे.

 या माहितीची खातरजमा करण्याकरीता पोलीस अधीक्षक पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, पोलीस कर्मचारी रौफ इनामदार, उमाकांत कुंजीर, सचिन गायकवाड, नीलेश कदम, महेश गायकवाड, रविराज कोकरे, अनिल काळे, गुरूनाथ गायकवाड, सुभाष राऊत, चंद्रकांत जाधव, ज्ञानदेव क्षीरसागर, अक्षय जावळे यांचे पथक संशयित आरोपी प्रशांत काळे याच्या मागावर पाठवले.

पथकाने खडकी येथील जिल्हा परिषद शाळेच्या समोरील रोडवर सापळा लावून प्रशांत काळे याला याब्यात घेतले. त्यावेळी प्रशांत याने इंडियन आर्मी लोगो असलेला खाकी रंगाचा टी शर्ट घातलेला होता.

पोलिसांनी प्रशांतकडे चौकशी केली असता माहिती मिळाली की, त्याने त्याच्या मित्रांना स्वतः लोकसेवक असल्याची बतावणी केली होती. भारतीय सेनेकडून त्याला पदके देखील मिळाल्याचे तो सांगत होता. खडकीमधील काळेवाडा येथील त्याच्या घरातील कपाटातून भारतीय सेना दलाचे बनावट नियुक्तीपत्र, सेना दलात विशेष प्रशिक्षण घेतल्यानंतर दिली जाणारी पदके, सन्मानचिन्ह, लोगो, भारतीय सेना दलाचे गणवेश, मोबाईल फोन पोलिसांना मिळाला.

पोलिसांनी एकूण 9 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्याच्यावर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक महाडीक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.