Pune : ‘ऑपरेशन ऑल आउट’मध्ये 482 नागरिकांवर गुन्हे ; 1284 वाहने जप्त

एमपीसी न्यूज : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पुण्यात सर्वत्र लॉकडाऊन आहे. मात्र, अशाही परिस्थितीत अनेक पुणेकर सकाळी मॉर्निंग करतात. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 482 पुणेकरांवर ऑपरेशन ऑल आउट अंतर्गत पोलिसांनी गुन्हे दाखल केले. तसेच 1284 वाहने जप्त करण्यात आली.

लॉकडाऊन सुरु असतानाही पुणेकर शुल्लक कारणांसाठी घराबाहेर पडत आहेत. या पूर्वीही अनेकदा कारवाई केली तरीही घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे पुणे पोलिसांनी कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शहरात ‘ऑपरेशन ऑल आउट’ राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या 482 नागरिकांवर कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच तब्बल 1284 वाहने जप्त करण्यात आली.

तर आतापर्यंत पोलिसांनी लॉकडाऊनच्या काळात 6 हजार 452 नागरिकांवर कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, 20  हजार पेक्षा नागरिकांना नोटीस बजावण्यात आली. या कारवाईत तब्बल 23 हजार वाहन जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्यामुळे अजून आकडा वाढणार आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोदी सरकारने आधी 14  एप्रिलपर्यंत 21  दिवसांचा लॉकडाऊन लागू केला होता. या कालावधीत महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत राहिली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा लॉकडाऊन3  मेपर्यंत वाढविला. लॉकडाऊन सुरु असतानाही मुंबई आणि पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे या दोन्ही शहरातील काही भाग सील करण्यात आले आहेत. तरीही नागरिक विनाकारण घराबाहेर फिरत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.