Pune Crime : कात्रज परिसरातून सराईत चोरटा अटकेत, घरफोडीच्या 13 गुन्ह्यातील 13 लाखाचा मुद्देमाल हस्तगत

एमपीसी न्यूज – भारती विद्यापीठ पोलिसांनी कात्रज सर्पोद्यान परिसरातून एका सराईत चोरट्याला अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत 13 गुन्हे उघड झाले असून यातील 13 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

रफिक शेख (वय 27, रा. सय्यदनगर, हडपसर) असे या चोरट्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार सर्पोद्यान समोर येणार असून त्याच्याजवळ ॲक्टिवा दुचाकी असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी सर्पोद्यानासमोर सापळा रचला आणि ॲक्टिवावरील एका तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे दुचाकीची कागदपत्र मागितले असता त्याने देण्यास टाळाटाळ केली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने दुचाकी चोरीची असल्याचे कबूल केले.

त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून पोलिस कोठडी घेतली. पोलीस कोठडीत त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने पुणे शहर आणि परिसरात घरफोडीचे अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांनी केलेले तेरा घरफोडीचे गुन्हे पोलिसांनी उघड केले आहेत. यात 227 ग्राम सोन्याचे दागिने, 1405 ग्राम चांदीचे दागिने, एक दुचाकी असा एकूण 13 लाख 7820 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपी हा सराईत चोरटा असून त्याने केलेले आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.