Pune : सराईतांना अटक करून 3 गावठी पिस्तूलासह 6 जिवंत काडतुसे जप्त

एमपीसी न्यूज – सांगलीहून पुण्यात शस्त्रसाठ्यासहित आलेल्या तिघांना अटक करून त्यांच्याकडून 3 गावठी पिस्तूलासह 6 जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत. ही कारवाई नवले ब्रीज येथे सिंहगड रोड पोलिसांनी केली आहे.

विश्वजीत ऊर्फ गुंडा विलास माने (वय 27,रा.आंधळी, सांगली), आकाश राजेंद्र बिरणे(वय 23, रा.सावळज, सांगली) आणि उदय रघुनाथ मोरे (वय 26, रा.वाळवा, सांगली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगली येथून सराईत गुन्हेगार पुण्यामध्ये मोठ्या शस्त्रसाठ्यानिशी येणार असल्याची माहिती पोलिसांना त्यांच्या खबऱ्याकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी नवले ब्रीज येथे सापळा रचला. आणि तेथे आलेल्या तिघांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली. पोलिसांना त्यांच्याजवळ 3 गावठी बनावटीचे पिस्टल आणि 6 जिवंत काडतुसे मिळाली. त्यानंतर पोलिसांना त्यांना अटक करून त्यांच्याजवळ असलेला शस्त्र साठा जप्त केला. तिन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सिंहगड रोड पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.