Pune: क्रूरपणा ! कंपनी मालकाने कामगाराला मारहाण करत केले घृणास्पद कृत्य

Pune: Cruelty! The company owner committed a disgusting act and beating a worker फिर्यादी तरुण हा कोथरूड परिसरातील एका खासगी कंपनीत कामाला आहे. मार्च महिन्यात कंपनीच्या कामानिमित्त तो दिल्लीला गेला होता.

एमपीसी न्यूज- पुण्यातील कोथरूड परिसरातून एक खळबळजनक आणि किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. एका कंपनी मालकाने आपल्या साथीदारांसह एका कामगाराचे अपहरण करत त्याला बेदम मारहाण केली आणि त्याच्या गुप्तांगावर सॅनिटायजरचा फवारा मारत पाय धुतलेले पाणी पिण्यास भाग पाडले. याप्रकरणी 30 वर्षीय तरुणाने फिर्याद दिली असून तिघांविरोधात कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी तरुण हा कोथरूड परिसरातील एका खासगी कंपनीत कामाला आहे. मार्च महिन्यात कंपनीच्या कामानिमित्त तो दिल्लीला गेला होता. परंतु लॉकडाऊनमुळे तो तिथेच अडकून पडला.

या कालावधीत त्याच्याजवळ पैसे संपले होते. त्याने मालकाकडे पैशाची मागणी केली होती. परंतु मालकाने अतिरिक्त पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे त्याला नाईलाजाने कंपनीचा लॅपटॉप हॉटेलमध्ये ठेवावा लागला. लॉकडाऊन संपल्यानंतर तो पुण्यात आला.

येथेही तो काही दिवस एका हॉटेलमध्ये क्वारंटाईन होते. पैसे नसल्यामुळे त्यांनी याठिकाणी कंपनीचा मोबाईल तारण ठेवला.

दरम्यान, तेथून बाहेर पडल्यानंतर तो 13 जून रोजी एका मित्रासोबत घोटवडे फाटा येथे गप्पा मारत उभा होता. या दरम्यान कारमधून आलेल्या कंपनी मालकाने त्याचे अपहरण करत त्याला कार्यालयात नेले आणि दोन दिवस डांबून ठेवले.

या दोन दिवसांत त्याला मारहाण केली, चिखलाने भरलेले पाय धुण्यास सांगून ते पाणी त्याला प्यायला लावले. इतकेच नाही तर त्याच्या गुप्तांगावर त्यांनी सॅनिटायजरने स्प्रे केले.

दरम्यान, दोन दिवसानंतर फिर्यादीने तिथून सुटका करून घेतली आणि कोथरुड पोलीस ठाणे गाठत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. परंतु, हा सर्व प्रकार घोटवडे गावच्या हद्दीत घडल्यामुळे हा गुन्हा तेथील पोलीस ठाण्यात वर्ग केला जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like