मंगळवार, डिसेंबर 6, 2022

Pune Cyber Crime : फेसबुकवरील अनोळखी मित्राकडून आयटी इंजिनियर तरुणीला 44 लाखांचा गंडा

एमपीसीन्यूज : अनोळखी तरुणाशी फेसबुकवर मैत्री करणे पुण्यातील एका सॉफ्टवेअर अभियंता तरुणीला चांगलेच महागात पडले. मदत करण्याच्या बहाण्याने या तरुणाची तब्बल 44 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात या प्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला.

फेसबुकवरील डॉ. स्टीफन बेंजामिन नामक आरोपीविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. एका 38 वर्षीय तरुणीने याप्रकरणी तक्रार दिली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी, पीडित तरुणी उच्चशिक्षित असून पुण्यातील एका कंपनीत सॉफ्टवेअर अभियंता म्हणून काम करते. साधारण आठवडाभरापूर्वी तिच्या फेसबूकवर एका अनोळखी व्यक्तिची फ्रेंड रिक्वेस्ट आली. तिनेही रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर त्याने तिच्याशी चॅटिंग करण्यास सुरुवात केली. माझी मुलगी भारतात शिक्षण घेण्यासाठी राहत असल्याचे त्याने सांगितले. तसेच आपण स्वतः डॉक्‍टर असल्याचे सांगत त्याने तिचा विश्वास संपादन केला.

एके दिवशी त्याने कोरोनामुळे मुलीला भेटायला येणं शक्य होत नाही. परंतु तिच्यासाठी गिफ्ट पाठवले असल्याचे त्याने या तरुणीला सांगितले. हे गिफ्ट दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्टवर कस्टममध्ये अडकून पडले असल्याचे त्याने तिला सांगितले.

गिफ्ट सोडवण्यासाठी या तरुणीला वेगवेगळ्या बँक खात्यात त्यांनी तब्बल 43 लाख लाख रुपये भरण्यास भाग पाडले. इतके पैसे भरल्यानंतर आणखी पैशांची मागणी होत असल्यामुळे या तरुणीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर तिने पोलिस स्टेशनला तक्रार दिली.

सायबर पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Latest news
Related news