Pune : सायरस पूनावाला यांचे नोबेल पुरस्कारासाठी नामांकन

एमपीसी न्यूज- जगभरातील 140 देशांमध्ये लस निर्यात करून बालकांसह दीड अब्ज लोकांचे प्राण वाचविणाऱ्या डॉ. सायरस पूनावाला यांचे यंदाच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन झाले आहे अशी घोषणा रुबी हॉल क्लिनिकचे वैद्यकीय संचालक डॉ. परवेज ग्रांट यांनी पुण्यात रविवारी केली. अमेरिकेतील ‘मॅसेचुसेट्स मेडिकल स्कूल’तर्फे (बोस्टन) सिरम इन्स्टिटय़ूटचे सायरस पूनावाला यांना ‘डॉक्टर ऑफ ह्य़ुमन लेटर्स’ पदवीने नुकतेच गौरविण्यात आले. त्या निमित्त माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते पुनावाला यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी डॉ. परवेज ग्रांट बोलत होते.

सत्काराला उत्तर देताना डॉ. सायरस पूनावाला म्हणाले की, देवाचे आशीर्वाद लाभल्यामुळे मी अनेक बालकांचे प्राण वाचवू शकलो. भविष्यात आणखी काम करावयाचे आहे. बलात्कारपीडित महिला आणि दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा जाच होत असलेल्या व्यक्तींसाठी काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. मात्र, त्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढे आले पाहिजे. त्यांना अर्थसाह्य़ करण्याबरोबरच सर्वतोपरी मदत करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी उद्योजक अतुल चोरडिया, अभिनेते संजय दत्त, अभिनेत्री मल्लिका शेरावत उपस्थित होते. ज्येष्ठ अभिनेते कबीर बेदी यांनी निवेदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.