Pune : भक्तीमय वातावरणात रंगला ‘तुका म्हणे’ आणि ‘वैकुंठ नायका ‘ रंगनृत्य आविष्कार

एमपीसी न्यूज- ‘ कैसा गाऊ गीती, कैसा ध्याऊं चित्ती । कैसी स्थिती मती ,दावी मज ।। तुका म्हणे जैसे ,दास केले देवा ‘ असे संत तुकारामांचे भावविभोर शब्द रंग नृत्यांतून समोर आले अन् ‘आता आवडीचा पुरवावा सोहळा ‘ अशी रसिकांची भक्तीमय अवस्था झाली. निमित्त होते ‘कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट’ आयोजित संत तुकारामांच्या अभंगांवर आधारित ‘तुका म्हणे’ हा रंगनृत्य आविष्कार !

आषाढी एकादशी निमित्त संत तुकारामांच्या अभंगांवर आधारित ‘तुका म्हणे’ हा रंगनृत्य आविष्कार ‘कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट’ तर्फे
आयोजित करण्यात आला होता. संकल्पना आणि दिग्दर्शन अरुंधती पटवर्धन, कल्याणी काणे यांचे होते. अरूंधती पटवर्धन, पायल जाधव यांनी बहारदार सादरीकरण केले.

‘सुंदर ते ध्यान ‘, ‘ भेटी लागे जीवा ‘ , ‘ बोलावा विठ्ठल – पहावा विठ्ठल ‘ , ‘याचसाठी केला होता अट्टहास’ ,अशा अजरामर अभंगरचना या कार्यक्रमात प्रस्तुत केल्या गेल्या, संतांच्या जीवनातील प्रसंग नृत्यातून सादर करण्यात आले. त्याला रसिकांनी भक्तीमय दाद दिली. याचबरोबर संत ज्ञानेश्वर, चोखामेळा, नरहरी सोनार, नामदेव,तुकाराम या संतांच्या अभंग रचनांचा नृत्याविष्कार ‘संत सेवा संघ’ आणि नीलिमा नृत्यालय तर्फे ‘वैकुंठ नायका ‘ या नावाने याच कार्यक्रमात सादर करण्यात आला. ‘वैकुंठ नायका ‘ला संगीत जीवन धर्माधिकारी यांचे होते . वैकुंठनायका – अभंगउत्सव मध्ये महाराष्ट्रीय संतांच्या अभंग रचनांचा नृत्याविष्कार सादर झाला.

‘वैकुंठनायका ‘आणि ‘देखील देवो ‘ या दोन अल्बम मधील अभंगांवर आधारित नृत्य स्पर्धांमधून बक्षीसपात्र नृत्य संरचनांचे सादरीकरण करण्यात आले. गुरू शमा भाटे, पवित्र भट, मानसी वझे, अमृता, मनिषा अभय, तेजस्विनी साठे, अरुंधती पटवर्धन यांच्या शिष्या सहभागी झाल्या. सर्व कलाकारांचा सत्कार नृत्य गुरु सुचेता चाफेकर यांच्या हस्ते करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.