Pune : राहत्या घरात आढळला निवृत्त बँक अधिकाऱ्याचा मृतदेह

एमपीसी न्यूज- राहत्या घरात एका निवृत्त बँक अधिकाऱ्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना बुधवारी (दि. 17) औंध परिसरात उघडकीस आली.

गणेश जातेगावकर (वय 84 रा. ब्लॉसम सोसायटी, गुलमोहर पार्क, आयटीआय रोड, औंध) असे या मृत अधिकाऱ्याचे नाव आहे. जातेगावकर हे बँक ऑफ इंडियाचे माजी अधिकारी होते. त्यांची मुले अमेरिकेत राहतात. घटनेची माहिती मिळताच चतुःशृंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला.

चतुःश्रृंगी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जातेगावकर यांनी बाहेर जाण्यासाठी एका वाहनचालकाला बुधवारी संध्याकाळी बोलावले होते. तो वाहनचालक गाडी घेऊन इमारतीच्या खाली आला त्याने जातेगावकर यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे चालकाने शेजारील रहिवाशांशी संपर्क साधला. जातेगावकर यांच्या घराची किल्ली दुसरीकडे असल्याचे लक्षात आल्याने त्या किल्लीद्वारे घराचा दरवाजा उघडला असता, बेडवर त्यांचा मृतदेह पडल्याचे आढळले. त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला हे अंतर अद्याप समजू शकले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.