Pune : यंदा श्री गणेशाची स्थापना मंडपाऐवजी मंदिरात करण्याचा निर्णय : बाबा धुमाळ

पुणे शहरात कोरोनाचे संकट अतिशय गंभीर झाले आहे. ; Decision to install Shri Ganesha in temple instead of mandapa this year: Baba Dhumal

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे संकट अतिशय गंभीर झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर श्री गणेशाची स्थापना यावर्षी मंडपात नव्हे तर मंदिरातच करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती श्रीमंत राजयोग गणेश मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बाबा धुमाळ यांनी शुक्रवारी दिली.

कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव कसा साजरा करायचा हा सर्वच कार्यकर्त्यांच्या मनात मोठा प्रश्न आहे. आपण आपली सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे या मताशी मी नेहमीच ठाम असतो.  म्हणूनच गेली 34 वर्ष जयहिंद तरुण मंडळाच्या माध्यमातून मोठ्या धुमधडाक्यात आमचा गणेशोत्सव साजरा केला जातो.

मात्र, यावर्षी गणेश चतुर्थीला स्थापनेच्या दिवशी व विसर्जना दिवशी कुठलीही मिरवणूक काढण्यात येणार नाही.

मागील 25 वर्षांपासून दर वर्षी अक्षय्य तृतीयेच्या दिवसापासून पुढील आठ दिवस अंखड हरिनाम सप्ताहचे आयोजन केले जाते. हा कार्यक्रम सुद्धा कोरोनाच्या संकटामुळे या वर्षी रद्द करण्याचा निर्णय मंडळाने घेतला.

कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी सर्वच गणेश मंडळांनी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा. घरातील गौरी गणपतीचा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा.

शक्यतो श्री गणेश मुर्तीचे विसर्जन घरी किंवा मंडपाच्या जागी करावे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये. आपण सर्वांनी या नियमांचे पालन करून शासनाला, प्रशासनाला व पोलीस खात्याला सहकार्य करावे, असेे आवाहनही  धुमाळ यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.