Pune : अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांच्या मुजोरपणाला आवर घाला ; सर्वपक्षीय नगरसेवकांची मागणी

एमपीसी न्यूज- अतिक्रमण विभागातील निरीक्षकच्या माध्यमातून सर्वाधिक भ्रष्टाचार सुरु असून हप्ते वसुलीचे काम सुरु आहे. असे अधिकारी चुकीच्या पद्धतीने कारवाई करत असून नगरसेवकांना दाद देत नाहीत. असा आरोप करीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत प्रशासनाला धारेवर धरले. अशा मस्तवाल अधिकाऱ्यांना आवर घालणे गरजेचे आहे अशी मागणी करण्यात आली.

काही दिवसापूर्वी हडपसर येथे अतिक्रमण कारवाई दरम्यान महिला पोलिसांकडून जेष्ठ महिलेला आणि सुनेला मारहाण झाल्याची घटना घडली होती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. सोमवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत यांचे पडसाद उमटले. तत्पूर्वी नगरसेवक बाशा ओसवाल यांनी अतिक्रमण विभागातील निरीक्षकाच्या गैरकारभाराचा पाढा वाचला.

या निरीक्षकाने व्यावसायिकांचा मोबाईल काढून घेतला. त्यानंतर तो मोबाईल पोलीस ठाण्यात मिळाला. त्यानंतर त्या निरीक्षकाने माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या कामासाठी फोन केल्यानंतर नगरसेवकांना अडकविण्याचा प्रयत्न होत असेल तर या गंभीर बाबीचा विचार करणे गरजेचे आहे. संबंधित निरीक्षकावर कारवाई करण्याची मागणी ओसवाल यांनी केली.

त्यानंतर उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी देखील अतिक्रमण विभागाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. ते म्हणाले, “अतिक्रमण अधिकारी मस्तवाल झाले आहेत. कारवाई करून रिकाम्या केलेल्या ठिकाणी नातेवाईकांना बसवितात. खोट्या पद्धतीने नातेवाईकांचे बायोमॅट्रीक करून घेतात. व्यावसायिकांना नगरसेवकांची नावे सांगून बदनाम करतात ” असाही आरोप डॉ. धेंडे यांनी केला. तर प्रिया गदादे यांनी व्यावसायिक महिलांना मारहाण करण्याचा अधिकार कोणी दिला असा प्रश्न उपस्थित करत भविष्यात असे प्रकार घडले तर नगरसेविका शांत बसणार नाहीत.

नगरसेवक धीरज घाटे म्हणाले, “पालिका सभागृहाने ५ हजार रुपये दंड मंजूर करून अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हातात कोलित दिले आहे. तेव्हापासून अधिकारी मुजोर झाले आहेत. पैसे मिळवण्यासाठी ते चुकीच्या पद्धतीने व्यावसायिकांची पिळवणूक करत आहेत. कारवाईची भीती दाखवून हप्ते घेतले जातात. पैसे खाण्यासाठी त्यांची साखळी झालेली आहे. सध्या सर्वाधिक भ्रष्टाचार अतिक्रमण विभागात चालतो. या अधिकाऱ्यांकडून नगरसेवकांनाही मुजोरपणे उत्तरे दिली जातात. त्यामुळे या मुजोर अधिकाऱ्यांना आवर घालावा”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.