Pune : काँक्रिटच्या रस्त्यांसाठी पाणी वापरण्यावर आयुक्त कारवाईचा निर्णय घेणार का ?

एमपीसी न्यूज- पुणे शहरात काँक्रीटचे रस्ते बनविण्याचे काम सुरु आहे. मात्र शहरामध्ये पाणीटंचाई जाणवत असताना काँक्रिटच्या रस्त्यांसाठी पाणी वापरण्यावर महापालिका आयुक्त कारवाईचा निर्णय घेणार का, असा प्रश्न स्वयंसेवी संस्थांकडून विचारला जात आहे.

दोन वर्षांपूर्वी पुण्यात पाण्याची भीषण टंचाई असताना काँक्रिटच्या रस्त्यांसाठी पिण्याचे पाणी वापरले जात असल्याची बाब उघड झाली होती. त्यानंतर रस्त्याच्या कामासाठी ठेकेदारांकडून पालिकेचे पाणी वापरले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. त्यामुळे रस्त्यांच्या कामासाठी पिण्याचे पाणी वापरू नये, अशी सूचना तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी केली होती. त्यानंतर तत्कालीन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी देखील रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी पाणी वापरल्यास संबंधित ठेकेदाराबरोबरच पालिकेतील अधिकाऱ्यावर कठोर कारवाईचा निर्णय घेतला होता.

दरम्यान, पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शहरातील गल्लीबोळातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांना स्थगिती देण्याची मागणी होत आहे. शहरात एकवेळच पाणीपुरवठा होत असून, नागरिकांना पाण्याचे टँकर विकत घ्यावे लागत असताना काँक्रिटीकरणासाठी पाणी वापरणे हा पाण्याचा अपव्यय आहे. त्यामुळे पाणीकपात रद्द होईपर्यंत काँक्रिटीकरणाची कामे थांबवावीत, अशा सूचना स्वयंसेवी संस्थांनी केल्या आहेत.

जिल्ह्यात पाणी टंचाईसदृश परिस्थिती असल्याने पुण्याच्या पाण्यात कपात करण्याचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला. ऐन दिवाळीच्या तोंडावर सोमवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यानुसार, शहराच्या विविध भागात दीड ते दोन तास पाणीपुरवठा होत आहे. पाणीपुरवठा विस्कळीत असल्याने नागरिकांना अक्षरशः ‘पाणीबाणी’ला तोंड द्यावे लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर पाण्याची काटकसर करण्यासाठी काँक्रिटीकरणाच्या सर्व कामांना स्थगिती देण्याची मागणी सजग नागरिक मंचाने केली आहे.

त्यावेळी जिल्हाधिकारी असलेले सौरभ राव आता महापालिका आयुक्त आहेत आणि पुण्यातील पाणी कपात पाहता आयुक्त सौरभ राव त्यावेळच्या निर्णयाची पुनरावृत्ती करणार का, हे पाहण्यासारख असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.