Pune : संजय काकडे यांच्यावर कारवाईची युक्रांदची मागणी

न्यु कोपरे गावातील वंचितांच्या पुनर्वसनासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदन

एमपीसी न्यूज- न्यु कोपरे गावाच्या पुनर्वसन प्रकल्पासंदर्भात अन्याय झालेल्या वंचित नागरिकांनी विकसक संजय काकडे यांच्याकडून करारानुसार सदनिका वा जागा न मिळाल्याने शुक्रवारी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची युवक क्रांती दल (युक्रांद) च्या नेतृत्वाखाली भेट घेतली. पुनर्वसनापासून वंचितांना तातडीने न्याय द्यावा आणि वंचितांची फसवणूक केल्याबद्दल विकसक संजय काकडे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी बाळासाहेब थोरात यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसनासाठी राखीव असलेल्या जुने हिंगणे गायरानाची जागा विकसनासाठी देऊन शासनाने संजय काकडे यांच्याशी करार केला होता. त्यानुसार सदनिका किंवा मोकळा भूखंड प्रकल्पग्रस्तांसाठी देय असताना अनेकांकडून हक्कसोडपत्र घेऊन फसवणूक करण्यात आली.

या सर्व प्रकरणात २००१ मध्ये महाराष्ट्र सरकार, विकसक श्री. काकडे आणि पुनर्वसित होणारी कुटुंबे यांच्यामध्ये त्रिपक्षीय करार झाला, तथापी मूळ यादीमधून अनेक कुटुंबांना वगळण्यात आले. काही गरीब लोकांना थोडीशी रकम देऊन त्यांच्याकडून हक्कसोड पत्रे घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्याकडून सदनिका खरेदी केल्याचा दावा विकसक करीत असून हे तद्दन बेकायदेशीर व गैरप्रकार असल्याचे म्हटले आहे.

विकसक संजय काकडे यांच्या विरोधात कठोर आदेश देऊन वंचित कुटुंबाचे पुनर्वसन करावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या भेटीच्या वेळी संदीप बर्वे, अप्पा अनारसे, सचिन पांडूळे, कमलाकर शेटे, आदीत्य आरेकर हे युक्रांदचे पदाधिकारी आणि यलाप्पा धोत्रे, नंदू शेळके, ललित मुथा, अनिल कौल हे वंचित प्रकल्पग्रस्त न्यु कोपरे ग्रामस्थ उपस्थित होते.

HB_POST_END_FTR-A2
You might also like