Pune : इंग्रजीसह सर्व शाळांत मराठी भाषा सक्तीने शिकवावी – साहित्यिकांची मागणी

एमपीसी न्यूज – इंग्लिश मीडियम आणि इतर माध्यमाच्या शाळांत मराठी भाषा सक्तीने शिकवली गेली पाहिजे, अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या बैठकीत साहित्यिकांकडून करण्यात आली.

इंग्लिश मीडियम आणि इतर माध्यमाच्या शाळांत मराठी भाषा सक्तीने शिकवली गेली पाहिजे. कारण, सध्याची पिढी इंग्रजी भाषेकडे वळत आहे. ही बाब गंभीर असून आता सरकारने इंग्लिश मीडियमच्या पहिली ते बारावी पर्यंतच्या शाळा आणि महाविद्यालयात मराठी भाषा सक्तीने शिकवली पाहिजे. यासाठी विशेष कायदा केला पाहिजे आणि आपली बाजू न्यायालयामध्ये टिकावी. यासाठी देखील सरकारने योग्य भूमिका मांडावी, अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत साहित्यिकाकडून करण्यात आली.

  • मराठी भाषा शिक्षणाचा कायदा सक्तीचा करण्यासंदर्भात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

यावेळी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले, विधिज्ञ भास्करराव आव्हाड, ज्येष्ठ विचारवंत हरी नरके, सोहनलाल जैन, प्रमोद आडकर, सुनिताराजे पवार आदी मान्यवर बैठकीला उपस्थित होते.

  • या बैठकीनंतर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, राज्यातील इंग्लिश मीडियाच्या शाळामध्ये मराठी भाषा शिक्षणाचा कायदा सक्ती करण्याबाबत आज बैठक घेण्यात आली. यावेळी अनेक मुद्यावर चर्चा झाली असून राज्यातील नागरिक, संस्थाचालक यांना स्वतःच म्हणणे मांडण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या संकेतस्थळावर १५ जुलै ते १५ ऑगस्ट २०१९ दरम्यान मसुदा ठेवण्यात येणार असून त्यावर देखील नागरिक व मराठी प्रेमी प्रतिक्रिया देऊ शकणार आहात. तसेच याबाबत चा सविस्तर मसुदा तयार करताना इंग्रजी माध्यमाचे संस्थाचालक पळवाटा काढणार नाही. याबाबत विशेष दक्षता घेतली जाणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मसुदा सुपूर्द करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच त्या पुढे म्हणाल्या की, मराठी शाळामध्ये विद्यार्थ्याचे प्रमाण वाढत आहे. अशी आकडेवारी मध्यंतरी समोर आली आहे. हे पाहून आनंद वाटला आता यापुढील काळात मराठी शाळांकडे विद्यार्थी कसे वाढतील. यावर आमचा भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.