Pune :अंबिल ओढा पूरग्रस्तांची बाकी असलेली आर्थिक मदत खात्यात जमा करा : अश्विनी कदम

एमपीसी न्यूज – मागील वर्षी २५ सप्टेंबर रोजी शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पूर आला होता. त्यामध्ये शहरातील सर्वात मोठ्या आंबील ओढ्याचे सर्वाधिक नुकसान झाले होते. या ओढ्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. यामध्ये जीवित आणि मालमत्तेची मोठ्या प्रमाणावर हानी झाली होती. पूरग्रस्तांना अद्यापही शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत पुरेशा प्रमाणात मिळालेली नाही. त्यामुळे या पूरग्रस्त नागरिकांना शासनाने जाहीर केलेली १५ हजारांची आर्थिक मदत पूर्णपणे मिळावी, अशी मागणी नगरसेविका आणि स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अश्विनी कदम यांनी केली आहे.

याबाबत त्यांनी पुणे शहर तहसीलदार तृप्ती कोलते यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘पुरग्रस्तांच्या हक्काची शिल्लक असलेली आर्थिक मदत त्यांच्यापर्यंत आताच पोहचली तर ती मोलाची मदत ठरेल. ही मदत यशस्वीरीत्या त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य देण्याची तयारी कदम यांनी दर्शविली आहे.

कोरोनाच्या कठीण संकटकाळात लोकप्रतिनिधी असल्याने ६ महिन्यांपूर्वी इतिहासात पहिल्यांदा नैसर्गिक आपत्ती म्हणून घडलेल्या आंबिल ओढा महापूराची सातत्याने आठवण होत राहते. पर्वती मतदारसंघातील अनेक भागांमधील घरे, वसाहती, सोसायट्या व बंगले यांमधील नागरिकांना (कुटुंबांना) मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले होते. अशा या सर्व पूरग्रस्त भागातील नागरिक आता कुठेतरी उभारी घेत असताना मार्च महिन्याच्या अखेरीस कोरोना सारख्या महाभयंकर विश्वव्यापी संकटामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करावा लागला व संपूर्ण देश थांबला. हा लॉकडाऊन तब्बल ४० दिवसांच्यावर व अजून पुढे किती जाईल माहीत नाही? असेही कदम यांनी निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, यावर कोलते यांनी एकूण ४६५५ कुटुंबांपैकी आतापर्यंत २७४६ कुटुंबांना संपूर्ण १५ हजार रुपये चेक स्वरूपात वाटप करण्यात आले असून, उर्वरित १९०९ कुटुंबांपैकी काही कुटुंबांना १० हजार रुपये, तर काहींना १५ हजार रुपये द्यायचे शिल्लक आहेत. पण सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही मदत चेक स्वरूपात पोहचविण्यासाठी मोठी अडचण येत आहे. यातील काही जणांनी बँक खात्याची माहिती दिली असली तरी रक्कम ऑनलाईन अदा करण्यासाठी अपूरी असल्यामुळे रक्कम ऑनलाइन अदा करण्यास अडचणीचे ठरत आहे. नागरिकांनी  तलाठी प्रज्ञा पंडित-9604436032 आणि सहाय्यक सजाउद्दीन शेख- 9860121184 यांच्या व्हाटसऍप नंबरवर बँक खात्यांची माहिती पुन्हा पाठविण्यात यावी, असे कोलते यांनी कदम यांना सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.