Pune : भाजपा नगरसेविकेचे बेकायदा जनसंपर्क कार्यालय पाडा : निलेश निकम

Destroy BJP corporator's illegal public relations office: Nilesh Nikam : मुख्यमंत्री, आयुक्तांना निवेदन

एमपीसी न्यूज – सत्ताधारी भाजपा नगरसेविका ज्योती गणेश कळमकर आणि त्यांच्या पतीने जनसंपर्क कार्यालयासाठी केलेले बेकायदा बांधकाम पाडण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते नीलेश प्रकाश निकम यांनी सोमवारी मुख्यमंत्री, महापालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.

दरम्यान, संबंधित जागा ही आमच्या मालकी हक्काची नाही. त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे कार्यालय लखन कळमकर यांनी सुरु केले आहे. त्या कार्यालयाशी माझा काहीही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया नगरसेविका ज्योती गणेश कळमकर यांनी दिली.

कळमकर यांनी सर्वे नंबर -८७, गणराज चौक आरबो हॉटेल समोर बाणेर येथे बेकायदेशीर आणि अनधिकृत संरचनात्मक बांधकाम संपर्क कार्यालयासाठी केले आहे. नुकतेच त्याचे उद्घाटन देखील झाले. हे कार्यालय ज्या ठिकाणी बांधले आहे, तेवढ्या क्षेत्रफळासाठी पुणे मनपा परवानगी देऊ शकत नाही.

त्या जमिनीचे क्षेत्रफळ छोटे आहे. असे असून देखील त्या जागेत ग्राउंड प्लस ०२ असे अंदाजे १००० ते १२०० स्क्वेअर फुट बांधकाम अनधिकृतरित्या केले आहे. या बेकायदेशीर संरचनात्मक बांधकामास नळजोडणी, वीज जोडणी मिळवली आहे.

हे बांधकाम बेकायदेशीर आणि अनधिकृत संरचनेमुळे त्याला कुठल्याही प्रकारचे पूर्णत्वाचा दाखला (Completion Certificate) आणि भोगवटा पत्र (Occupancy Certificate) नसतानाही त्या बांधकामाचा उपयोग जनसंपर्क कार्यालय म्हणून केला जात आहे.

कार्यालयास भाजपच्या अनेक बड्या नेत्यांचे फोटो लावलेले आहेत. पुणे महानगरपालिकेच्या विद्यमान सदस्य यांनी आपल्या पालिकेच्या नगरसेवक पदाचा गैरवापर करून तसेच महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ (१९६६ चा महा. ३७) याचा अधिनियमांखाली करण्यात आलेल्या नियम व विधींच्या तरतुदीचा जाणीवपूर्वक भंग केलेला आहे.

त्यामुळे त्यांचे पुणे मनपा सदस्य पद रद्द होण्याबाबत प्रशासकीय स्तरावरून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निलेश प्रकाश निकम यांनी या निवेदनात केली आहे. पुणे महानगरपालिकेच्या कुठल्या अधिकाऱ्याच्या ही बाब लक्षात का आली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

संबंधित कायदेशीर आणि अनधिकृत संरचनात्मक केलेले बांधकाम त्वरित बेपाडण्यात यावे. तसेच पुढील १० दिवसांत हे बेकायदेशीर केलेल्या बांधकामावर त्वरित कारवाई करण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा निकम यांनी दिला आहे.

प्रभाग क्रमांक 9 मधील सर्वच नगरसेवकांच्या जनसंपर्क कार्यलयाची माहिती घ्यावी. ते किती अधिकृत आणि अनधिकृत किती प्रमाणात आहे, याचीही माहिती घेण्यात यावी. खोटा आरोप करणाऱ्या व आमची बदनामी करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात आम्ही पुरावे घेऊन अब्रुनुकसानीचा दावा दाखल करू, असा इशारा गणेश कळमकर यांनी दिला आहे.

प्रभाग क्रमांक 9 मधील सर्व नगरसेवकांच्या जनसंपर्क कार्यलायाची, घरे, मोकळ्या जागा याची माहिती तक्रारदराने घेऊन कारवाईची मागणी करावी, असेही आवाहन कळमकर यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.