Pune : पालकमंत्र्यांच्या बैठकीत बिडकरांना पाहताच धंगेकर संतापले; बैठकीवर टाकला बहिष्कार

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्याचे (Pune) पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर हे देखील या बैठकीला उपस्थित होते. मात्र या बैठकीला लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांपेक्षा भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचीच गर्दी जास्त होती.

भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक गणेश बिडकर हे देखील या बैठकीला उपस्थित होते. बैठकीत इतरांपेक्षा गणेश बिडकर हेच जास्त बोलत असल्याचे पाहून आमदार धंगेकर यांनी बैठकीवर थेट बहिष्कार घातला आणि तडकाफडकी बाहेर पडले.

बाहेर पडल्यानंतर माध्यमांशी बोलत असताना रवींद्र धंगेकर म्हणाले, चंद्रकांत पाटलांनी पुण्यातील विविध विषयासंदर्भात महापालिका अधिकारी आणि सहा निमंत्रित आमदारांची बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीमध्ये पालकमंत्र्यांपेक्षा भाजपची कार्यकर्ते जास्त बोलत होते.

गणेश बिडकर हे नगरसेवक (Pune) नाहीत किंवा कुठले पदाधिकारी नसून देखील पालकमंत्र्यांपेक्षा जास्त या मीटिंगमध्ये बोलत होते. या बैठकीचा ताबा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी घेतला होता. यामुळे आपण या बैठकीतून काढता पाय घेतल्याचे धंगेकर यांनी म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले, चंद्रकांत पाटलांना अशीच बैठक घ्यायची होती.तर त्यांनी थेट जनतेमध्ये जाऊन बोलायला पाहिजे होते. या बैठकीत आमदारांपेक्षा भाजपचे कार्यकर्तेच जास्त बोलत होते. या बैठकीमध्ये शहरातील रस्ते, जायका प्रकल्प, नदी सुधार प्रकल्प आणि पाण्याची योजने संदर्भात चर्चा होणार होती.

या चर्चेमध्ये मला देखील माझं मत व्यक्त करायचं होतं. मात्र, असा बैठकीतील प्रकार बघून आपण निघून आलो असल्याचे धंगेकर यांनी सांगितले.

दरम्यान, बैठकीत बसल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी माझ्याकडे साधं बघितलंही नाही. तसेच, मी निघून आलो तेव्हा त्यांना कळले देखील नसेल की मी या बैठकीला आलो होतो, असा टोला देखील त्यांनी लगावला.

Pune : जमीन खरेदीच्या बहाण्याने सेवानिवृत्त सहायक पोलिस आयुक्तांची 66 लाख रुपयांची फसवणूक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.