Pune : तांत्रिक अडचणीनंतर कमला नेहरु रुग्णालयातील डायलिसिस सेवा पूर्ववत सुरू

'लायन्स क्लब ऑफ पुणे मुकुंदनगर ट्रस्ट ' कडून पालिकेच्या अधिक सहकार्याचे पत्रकार परिषदेत आवाहन

एमपीसी न्यूज- लायन्स क्लब ऑफ पुणे मुकुंदनगर चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत पालिकेच्या सहकार्याने कमला नेहरु रुग्णालय येथे डायलिसिस केंद्र सवलतीच्या दरात शहरी गरीब रुग्णांसाठी 2015 पासून चालवले जाते. पब्लिक -प्रायव्हेट पार्टनरशिप तत्वावर सेवाभावी वृत्तीने चाललेल्या या प्रकल्पात आजवर हजारो रुग्णांनी लाभ घेतला असून या सेवेत कोणतीही कसूर राहिलेली नाही. पालिकेनेच या पथदर्शी प्रकल्पाला अधिक सहकार्य करावे, असे आवाहन शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आले.

पालिकेच्या सर्वसाधारण सभेत या केंद्राच्या संचालनाबाबत काही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्या विषयी वस्तुस्थिती समोर आणण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. तांत्रिक अडचणीं नंतरदेखील डायलिसिस सेवा पूर्ववत सुरु केली असल्याची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली .

लायन्स क्लब ऑफ पुणे मुकुंदनगर चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त आणि प्रकल्पप्रमुख नितीन नाईक ,एड. सुधीर निरफराके ( लायन्स क्लब ऑफ पुणे मुकुंदनगरचे अध्यक्ष ), डॉ. संजय भालेराव (ट्रस्टचे विश्वस्त ) यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले .

नितीन नाईक यांनी प्रकल्पाबाबत माहिती देताना सांगितले की, 2 ऑकटोबर 2015 रोजी गांधीजयंती पासून हे डायलिसिस केंद्र सेवाभावी वृत्तीने चालू करण्यात आले. जागा पालिकेची आणि सर्व यंत्रसामग्री, संचालन लायन्स क्लब ऑफ पुणे मुकुंदनगरचे असा हा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचा डायलिसिस सेवेचा पहिला संयुक्त प्रकल्प आहे. पुणे शहरातील हा पहिलाच पथदर्शी प्रकल्प असून तो यशस्वीपणे चालविला जातो. यंत्रसामग्रीसाठी लायन्सने दीड कोटी रुपये खर्च करून 15 डायलिसिस यंत्रे बसवली. आतापर्यंत 21 हजार डायलिसिस सेशन करण्यात आली आहेत.

शहरी गरीब योजनेखाली प्रति रुग्ण, प्रति वर्ष 1 लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा पालिकेकडून होती. ती नंतर जानेवारी 2018 मध्ये 2 लाख रुपये करण्यात आली. त्यात रुग्णाला कोणताही खर्च द्यायचा नसल्याने केंद्र चालविण्यासाठी लायन्स क्लबला पालिकेकडून येणाऱ्या निधीवर अवलंबून राहावे लागत होते. गेल्या 10 महिन्यात हा निधी पालिकेकडून मिळण्यात अनियमितपणा झाला. पत्राद्वारे आणि प्रत्यक्ष भेटींद्वारे वारंवार ही वस्तुस्थिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. या दिरंगाईमुळे दैनंदिन कामकाज, डायलिसिस मशीन दुरुस्ती-देखभालीवर परिणाम झाला. काही मशीन बंद ठेवावी लागली. 1 फेब्रुवारी ते 4 मार्च 2019 दरम्यान हे केंद्र बंद ठेवावे लागले. हे केंद्र बंद असतानाच्या काळात रुग्णांची सोय विविध ठिकाणी करण्याची दक्षता या केंद्राने घेतली. त्यांची गैरसोय होऊ दिली नाही .

या सर्व प्रक्रियेत मनपा अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले. परंतु ,अजूनही प्रशासकीय तरतुदींमधील अडथळे दूर करण्याची अत्यंत गरज आहे. त्यामुळे हे केंद्र अजून उत्तम सेवा देऊ शकेल. या गोष्टी पालिकेच्या आरोग्य विभागाला कळविण्यात आल्या आहेत, असेही या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

लायन्स क्लबने योग्य ती पावले उचलून 5 मार्च पासून केंद्र पूर्ववत सुरु करण्यात आले. दरम्यान, पालिकेच्या सर्वसाधारण सभेत ,काही वृत्तपत्रात या केंद्राच्या संचालनाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले, बातम्या प्रसिद्ध झाल्या, त्यात पालिकेने देय रक्कम न दिल्याने केंद्र चालविण्यात अडचण येत असल्याचा उल्लेख करण्यात आला नाही. त्यामुळे लायन्स क्लबच्या सेवाभावी दृष्टिकोणावर आणि योगदानावर गैरसमज निर्माण झाले. त्याबाबत वस्तुस्तिथी स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली. प्रत्यक्षात ,हा प्रकल्प अशा स्वरूपाचा पुण्यातील ,राज्यातील आणि सर्व देशातील पहिला यशस्वी प्रकल्प आहे. लायन्स क्लब हे डायलिसिस केंद्र चालविण्यासाठी कटिबद्ध असून पालिकेनेच सहकार्यात नियमितपणा ठेवल्यास संचालन करण्यात मदत होणार आहे, ही वस्तुस्थिती या पत्रकार परिषदेत मांडण्यात आली .

विविध लायन्स क्लबतर्फे पुण्यात अनेक ठिकाणी सुमारे 75 पेक्षा जास्त डायलिसिस मशिनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विविध प्रकारची १० कोटी पेक्षा अधिक रकमेची समाजोपयोगी कामे सुरु आहेत. प्रदूषण रोखण्यासाठी २०० उपकरणे शहराच्या चौकात बसविण्याचा प्रस्ताव पालिकेला दिला आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.