Pune : सर्वेक्षण करणाऱ्या लेखनिक-शिक्षण सेवकांना कामातून मुक्तता करा : दिपाली धुमाळ

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव विषयी नागरिकांमध्ये जनजागृती करणे, या रोगाची कोणास बाधा झाली आहे का, याबाबत घरोघरी जाऊन नागरिकांकडून माहिती घेणे, याकरिता मनपाच्या लेखनिक व शिक्षक सेवक गेले 24 दिवस दिवस सर्वेक्षण प्रामाणिकपणे करीत आहे. त्यांना आता या कामातून तातडीने मुक्त करावे, अशी मागणी महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केली आहे.
या संदर्भात धुमाळ यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, यापूर्वी सर्वेक्षण करणाऱ्या सर्व सेवकांची 14 दिवस पूर्ण झाल्यावर या कामातूनप्रशासनाकडून मुक्तता करण्यात येणार होती. त्याजागी नवीन दुसरे सेवक नियुक्त करण्यात येणार होते. सध्या सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता 24 दिवस झाले आहे, तरी या लेखनिक – शिक्षक सेवकांची सर्वेक्षणाच्या कामातून मुक्तता केलेली नाही.
सर्वेक्षणाचे काम करणाऱ्यांमध्ये आधिक महिला असून त्यांना फार अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सर्वेक्षणाचे काम करण्यासाठी चांगल्या दर्जाचे मास्क, हॅन्ड ग्लोज,( sanityzer) क्षेत्रीय कार्यालयाकडून पुरविल्या जात नाहीत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत.
हा संसर्ग अधिकधिक पसरू नये याकरिता महानगरपालिके मार्फत प्रयत्नांची पराकाष्टा करण्यात येत आहे. क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेल्या भागांमध्ये सेवक सर्वेक्षणाचे काम नियमित व प्रामाणिकपणे करीत आहेत. परंतु, हे काम करीत असताना क्षेत्रीय स्तरावर असलेले नियोजन अत्यंत ढिसाळ पद्धतीचे असल्याची तक्रार धुमाळ यांनी निवेदनात केली आहे.
त्यामुळे महानगरपालिकेचे लेखनिक, शिक्षक सेवक सर्वेक्षणाचे काम करीत आहे, अशा सर्व सेवकांना यापूर्वी मागणी केल्याप्रमाणे सर्वेक्षणाच्या कामातून कार्यमुक्त करून त्यांच्या जागी अन्य सेवकांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी धुमाळ यांनी केली आहे.