Pune : प्राणी, पक्षी यांच्यामुळे होतोय विजपुरवठा खंडित -महावितरणची माहिती

एमपीसी न्यूज – शहरी व ग्रामीण भागात साप, मांजर, उंदीर तसेच पक्ष्यांमुळे विजपुरवठा खंडित होत असल्याचे महावितरण कर्मचाऱ्यांना आढळून आले आहे. महावितरणच्या रोहित्रांना संरक्षक जाळ्या, कपाऊंड लावलेले आहे. परंतु अनेक ठिकाणी कंपाऊंडच्या आतमध्ये कचरा व शिळे खाद्यपदार्थ टाकण्यात येत असल्याचे दिसून येत आहे . खाद्यपदार्थामुळे मांजर, उंदीर, घुस याचबरोबर सरपटणारे प्राणी तेथे येतात. विजयंत्रणेच्या संपर्कात आल्यावर शार्टसर्कीट होऊन विजपुरवठा खंडित होत असल्याचे दावा महावितरण कडून करण्यात येत आहे.

अवकाळी वादळी व मुसळधार पावसामुळे भूगर्भात उकाडा वाढल्याने प्रामुख्याने विषारी, बिनविषारी साप जमिनीवर येत आहेत. पुणे शहरासह जिल्ह्याच्या काही भागात चार ते पाच फुटांचे मृत साप रस्त्यालगतचे फिडर पिलर्स, भूमिगत विजवाहिन्यांच्या खोदकामात, रोहित्राच्या स्ट्रक्चरवर, वीजखांबांवर आदी ठिकाणी दिसून आले आहेत. या सापांमुळे शार्टसर्कीट झाल्याने विजपुरवठा देखील खंडित झाला होता.

काही ठिकाणी दुरुस्तीची कामे करताना प्रामुख्याने फिडर पिलर्स किंवा भूमिगत विजवाहिन्यांच्या खोदकामत जिवंत साप आढळून आलेले आहेत. प्रामुख्याने ग्रामीण भागात वीजखांबांच्या टोकावर कावळा आणि त्यापेक्षा मोठ्या आकाराचे पक्षी बसल्याने शार्टसर्कीट होऊन वीजपुरवठा खंडित होत असल्याचे प्रकार दिसून येत आहेत.

सध्या कोरोना विषाणूंची आपत्ती सुरु असल्याने घरात साठलेला ओला व सुका कचरा वीजयंत्रणेजवळ टाकण्याचे प्रकार दिसून येत आहेत. शहरी व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विजवाहिन्या, फिडर पीलर, रोहित्र, डिस्ट्रीब्यूशन बॉक्स, डीपी आदी विजयंत्रणेजवळील उघड्यावर असलेल्या जागेत घरातील कचरा दिसून येत आहे.

विजयंत्रणेजवळ साठवलेला कचरा पेटविल्याने किंवा जळाल्याने जवळच असलेल्या विजेच्या भूमिगत केबल व इतर वीजयंत्रणा आगीमुळे नादुरुस्त होण्याची शक्यता आहे. ओव्हरहेड विजतारांखाली असलेल्या कचर्‍याच्या ढिगारा पेटविल्यामुळे किंवा त्यास आग लागल्यामुळे वीजतारा वितळून वीज खंडित होण्याचा धोका आहे.

त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी असलेल्या रोहित्रांसह विजयंत्रणेच्या परिसरात किंवा कपाऊंडमध्ये ओला व सुका कचरा टाकण्याचे टाळावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.