Pune : जिल्हा प्रशासनाकडून ‘कोरोना – तपासणी पथकां’ची स्‍थापना

जिल्हा प्रशासनाची सर्व पातळ्यांवर जोरदार तयारी

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूंचा प्रसार इतर विषाणूंच्‍या तुलनेत अधिक होत असल्‍याने सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर यांनी सांगितले. जिल्‍हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. जिल्हा प्रशासनाकडून ‘कोरोना – तपासणी पथके’ स्थापन करण्यात आली आहेत. जिल्हा प्रशासन कोरोना विरुद्ध लढण्यासाठी विविध पातळ्यांवर सज्ज झाले असल्याचेही विभागीय आयुक्तांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. बैठकीसाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील, पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल, आरोग्य उप संचालक डॉ. संजय देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, डॉ. रामचंद्र हंकारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, उप विभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख, सचिन बारावकर, डॉ. मितेश घट्टे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे, महसूल, पोलीस आणि आरोग्य विभागातील महत्वाचे अधिकारी उपस्थित होते.
पुण्‍यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्‍यानंतर त्‍यांच्‍या संपर्कात आलेल्‍या व्‍यक्‍तींची तपासणी करण्‍यासाठी पथके स्‍थापन करण्‍यात आली आहेत. ही पथके या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती काढण्यासाठी तसेच अन्य काळजी घेण्यासाठी स्थापन करण्यात आली आहेत. त्यामध्ये महसूल, आरोग्य, पोलीस आणि पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकांचे अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
याबरोबरच जिल्‍हा शल्‍य चिकीत्‍सक आणि जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी यांच्‍या मार्गदर्शनानुसार अंगणवाडी सेविका आणि आशाताई यांचा समावेश असलेल्या पथकांचीही निर्मिती करण्‍यात येणार आहे. या पथकाद्वारे हे दोन्ही रुग्ण ज्या विभागामध्ये किंवा परिसरामध्ये गेले असतील त्या ठिकाणी कोरोना बाधित अथवा संशयित व्यक्ती आढळून येत असल्यास त्याची खातरजमा करण्यात येणार आहे. ही खातरजमा करतांना पथकाने आवश्‍यक ती खबरदारी घेण्‍याच्‍या सूचना बैठकीत देण्‍यात आल्‍या.
आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले. ज्‍या व्‍यक्‍तींना संपर्क करणार असाल त्‍यांच्‍यापासून सुरक्षित अंतर राखणे, ताप, खोकला येत आहे का, तसेच गेल्‍या महिन्‍याभरात परदेशात जाऊन आले किंवा परदेशात जाऊन आलेल्‍या व्‍यक्‍तींच्‍या संपर्कात आले आहे का, याबाबत तपासणी करण्‍यात यावी. ज्‍या व्‍यक्‍तींची तपासणी करणार असाल त्‍यांची संपूर्ण माहिती गोपनीय ठेवण्‍याच्‍या सक्‍त सूचना त्‍यांनी यावेळी देण्यात आल्या.
जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम म्‍हणाले, कोरोना हा आजार योग्‍य खबरदारी व वेळीच उपचार केल्‍यास बरा होवू शकतो. त्‍यामुळे तपासणी पथकातील व्‍यक्‍ती तसेच नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. कोरोनाचा प्रसार वेळीच रोखण्‍यासाठी विभागीय आयुक्‍त डॉ. म्‍हैसेकर यांनी सोमवारी चार तास बैठक घेतली. तसेच मंगळवारी तीन तास सर्व संबधितांची बैठक घेवून मार्गदर्शन केले. कोरोनाचा प्रसार इतर विषाणूंपेक्षा जास्‍त असल्याने काळजी घेतली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.