Vadgaon News : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतीपूरक व्यवसायाला करणार भरीव अर्थसहाय्य – माऊली दाभाडे

पोल्ट्री व्यावसायिकांनी संधीचा फायदा घ्यावा; दाभाडे यांचे आवाहन

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकऱ्यांना शेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसायाला भरीव अर्थ सहाय्य करणार आहे. पोल्ट्री व्यवसायात असणा-या शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घेऊन नवीन तंत्रज्ञान वापरून स्वतःचा पोल्ट्री व्यवसाय करावा असे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक माऊली दाभाडे यांनी केले. मावळ तालुका पोल्ट्री संघटनेने वडगाव मावळ येथील बॅंकेच्या सभागृहात आयोजित केलेल्या बँक अर्थ सहाय्य मेळाव्यात दाभाडे बोलत होते.

यावेळी उद्योजक बबनराव भोंगाडे, संघटक सोनबा गोपाळे गुरूजी, संघटना अध्यक्ष एकनाथ गाडे, कार्याध्यक्ष सुभाष केदारी, सचिन आवटे, संभाजी शिंदे, एकनाथ पोटफोडे, समीर दाभाडे, एकनाथ वाडेकर, संभाजी केदारी, महेश कुडले, सोमनाथ राक्षे, बाबाजी पाठारे, संदीप मालपोटे,संतोष घारे, दत्तात्रय तिकोने आदी पोल्ट्री व्यावसायिक उपस्थित होते.

सध्या जे पोल्ट्री व्यावसायिक पोल्ट्री व्यवसाय करीत आहेत. त्यांच्याकरीता बँक त्यांना पक्षी, खाद्य, औषधे खरेदी करण्यासाठी व व्यवस्थापन यासाठी मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा करणार आहेत. शेतकऱ्यांनी या कर्जातून स्वतःच पोल्ट्री व्यवसाय करून खुल्या बाजारपेठेत उतरावे असे आवाहन दाभाडे यांनी यावेळी केले तसेच शेतकऱ्यांनी स्वयंचलित पोल्ट्री सुरू करावी.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मावळ विभाग प्रमुख गुलाबराव खांदवे यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. तर प्रास्ताविक पोल्ट्री संघटक सोनबा गोपाळे गुरूजी यांनी केले. याशिवाय समीर दाभाडे, एकनाथ वाडेकर यांनी विशेष मार्गदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.