Pune: दौंड येथील एसआरपी कॅम्पला जिल्हाधिकाऱ्यांची भेट, सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन

Pune: District Collector Naval Kishor Ram visits SRP camp at Daund, assures full cooperation amid coronavirus pandemic राज्य राखीव पोलीस बलातील कोरोनाची लागण झालेले रुग्ण, बरे झालेल्यांची संख्या आदी बाबींचा आढावा घेतला.

एमपीसी न्यूज- राज्य राखीव पोलीस बलातील कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.

दौंड येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 ला आज (दि.10) जिल्हाधिकारी राम यांनी भेट देऊन कोरोना परिस्थितीबाबत आढावा घेतला.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 7 चे समादेशक श्रीकांत पाठक, गट क्रमांक 5 चे समादेशक तानाजी चिखले, पोलीस उपअधीक्षक ऐश्वर्या शर्मा, उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार संजय पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली सोनवणे, नितीन भोसले, वैद्यकीय अधीक्षक संग्राम डांगे आदी उपस्थित होते.

राज्य राखीव पोलीस बलातील कोरोनाची लागण झालेले रुग्ण, बरे झालेल्यांची संख्या आदी बाबींचा आढावा घेऊन जिल्हाधिकारी राम म्हणाले, राज्य राखीव पोलीस बलातील पोलिसांना वैद्यकीय सुविधा देण्यात येणाऱ्या रुग्णालयांना कोणत्याही साधनसामग्रीचा तुटवडा भासू दिला जाणार नाही.

त्यासाठी आवश्यक ती मदत जिल्हा प्रशासन तात्काळ उपलब्ध करून देईल. कोरोना प्रतिबंधाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावांना तात्काळ मान्यता दिली जाईल.

पोलिसांना कोणत्याही कारणाने तब्येतीचा त्रास जाणवला अथवा कोरोना सदृश्य लक्षणे आढळून आल्यास त्यांनी तात्काळ तपासणी करून घ्यावी. शासकीय अथवा खाजगी रुग्णालयात वैद्यकीय सेवा मिळवून देण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी मदत करेल, असे ते म्हणाले.

कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक तत्वानुसार वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने पोलिसांना औषध उपचार देण्याची व्यवस्था समादेशक यांनी करावी, असे सांगून जिल्हाधिकारी राम पुढे म्हणाले, आपण सर्वांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे.

त्याचबरोबर सॅनिटायझरचा वापर, स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी कोरोना परिस्थितीची माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.