Pune District Corona Update: पुणे जिल्ह्यातील एक लाखांपेक्षा जास्त रुग्णांनी केली कोरोनावर मात, 76 टक्के कोरोनामुक्त!

पुणे जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांचे प्रमाण देशाच्या अडीच पट तर राज्याच्या सव्वादोन पटींहून जास्त

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातील एकूण 1 लाख 32 हजार 293 कोरोनाबाधितांपैकी तब्बल एक लाख 712 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचे प्रमाण 76 टक्क्यांहून अधिक झाले आहे. 

पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी याबाबतची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 3 हजार 290 रुग्णांचा मृत्यू झाला असून कोरोना मृतांचे प्रमाण 2.49 टक्के आहे. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची एकूण संख्या 28 हजार 425 आहे. सक्रिय रुग्णांचे प्रमाण 21.49 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.

कोरोना चाचण्यांमध्ये पुणे जिल्हा अव्वल!

पुणे जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांचे प्रमाण देशाच्या अडीच पट तर राज्याच्या सव्वादोन पटींपेक्षा जास्त आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. भारतात दर 10 लाख लोकसंख्येमागे 23 हजार 322 कोरोना चाचण्या होत आहे. महाराष्ट्रात हेच प्रमाण 25 हजार 585 इतके आहे. पुणे जिल्ह्यात मात्र दर 10 लाख लोकसंख्येमागे 60 हजार 901 चाचण्या होत आहेत. त्यामुळे स्वाभाविकपणे कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचे प्रमाण जास्त दिसून येत आहे.

पुणे शहरात 79 टक्के रुग्ण कोरोनामुक्त

पुणे महापालिका क्षेत्रात सर्वाधिक 3 लाख 77 हजार 81 चाचण्या झाल्या असून त्यातून 77 हजार 368 पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले. त्यापैकी 60 हजार 963 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. शहरात 1 हजार 997 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. शहरात आता 14 हजार 556 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये 71.3 टक्के रुग्णांची कोरोनावर मात

पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात 1 लाख 40 हजार 141 कोरोना चाचण्या झाल्या असून त्यातून 37 हजार 716 पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले. त्यापैकी 26 हजार 890 रुग्णांनी कोरोनाची लढाई जिंकली आहे. शहरात एकूण 719 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. शहरात आता 10 हजार 97 सक्रिय रुग्ण आहेत.

निमशहरी भागात 73 टक्के रुग्णांनी जिंकली कोरोनाची लढाई

पुणे जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रांमध्ये 18 हजार 700 कोरोना चाचण्या चाचण्या झाल्या असून त्यातून 3 हजार 306 पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले. त्यापैकी 2 हजार 412 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे तर 135 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नगरपालिका क्षेत्रांमध्ये आता 759 सक्रिय रुग्ण आहेत.

कॅन्टोन्मेंट क्षेत्रांत 78 टक्के रुग्ण बरे

पुणे, खडकी व देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या क्षेत्रात 11 हजार 15 कोरोना चाचण्या झाल्या असून त्यातून 2 हजार 904 पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले. त्यापैकी 2 हजार 263 रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. आतापर्यंत 106 रुग्णांनी प्राण गमावले आहेत. कॅन्टोन्मेंट क्षेत्रात आता 535 सक्रिय रुग्ण आहेत.

ग्रामीण भागात 74.40 टक्के रुग्ण कोरोनामुक्त

जिल्ह्याच्या उर्वरित ग्रामीण भागात 39 हजार 273 कोरोना चाचण्या झाल्या असून त्यातून 10 हजार 999 कोरोनाबाधित रुग्ण सापडले. त्यापैकी 8 हजार 184 रुग्ण बरे झाले असून 333 जणांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात आता 2 हजार 482 रुग्ण सक्रिय आहेत

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.