Pune District Crime News : ब्युटी पार्लरमध्ये फेशियलसाठी गेलेल्या प्रोफेसर महिलेचे दागिने लांबवले

तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसीन्यूज ; ब्युटी पार्लरमध्ये फेशियल करण्यासाठी गेलेल्या प्रोफेसर महिलेचे तीन अज्ञात महिलांनी दागिने चोरून नेले. फेशियल करत असताना या महिलेने अंगावरील दागिने काढून पर्समध्ये ठेवले होते. फेशियल होत असताना फिर्यादीने डोळे मिटल्याची संधी साधून आरोपी महिलांनी ही पर्स चोरून नेली. या पर्समध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा 75 हजाराचा मुद्देमाल होता.

जुन्नर शहरात 26 नोव्हेंबर रोजी हा प्रकार घडला.

याप्रकरणी सुप्रिया हेमंत काळे (वय 36) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार ब्युटी पार्लरमध्ये आलेल्या तीन अज्ञात महिलांविरोधात जुन्नर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी या फिर्यादीच्या प्रोफेसर आहेत. 26 नोव्हेंबर रोजी त्या जुन्नर येथील सप्तशृंगार लेडीज पार्लरमध्ये फेशियल करण्यासाठी गेल्या होत्या. फेशिअल करत असताना त्यांनी अंगावरील मिनी गंठण आणि सोन्याची चैन काढून पर्समध्ये ठेवले होते. फेशियल होत असताना त्यांनी ही पर्स आपल्या पायाजवळ ठेवली होती.

फेशियल झाल्यानंतर जेव्हा त्यांनी डोळे उघडून पाहिले तेव्हा त्यांना पर्स दिसली नाही. त्यानंतर त्यांनी ब्युटी पार्लरमधील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता तीन संशयित महिला दिसल्या.

फेशियल होत असताना फिर्यादीच्या चेहऱ्यावर ब्लिच क्रीम लावली होती. त्यामुळे त्यांनी डोळे बंद केले होते. हीच संधी साधून या महिलांनी संगणमत करून सोन्याचे दागिने असलेली पर्स चोरून नेली.

जुन्नर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक मोहिते करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.