Pune : महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागाचे पुणे जिल्हा संपर्क अभियान

एमपीसी न्यूज -महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय फोंडा, गोवा यांच्या वतीने 14  विद्या आणि 64 कला यांचे सात्त्विक पद्धतीने सादरीकरण आणि त्यायोगे ईश्वरप्राप्ती यादृष्टीने अभ्यास चालू आहे. महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक प.पू.डॉ.जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विषयांवर संशोधनही केले जाते.

याचाच एक भाग म्हणून गायन, वादन आणि नृत्य यामधील विविध कलाकारांच्या भेटी घेणे, त्यांच्या साधना प्रवासाविषयी जाणून घेणे, मुलाखती घेणे या साठी संगीत विभाग प्रयत्नरत आहे.दिवसेंदिवस दुर्मिळ होत चाललेल्या धृपद, पखवाज, जलतरंग अशा गायन आणि वादन पद्धतींचे जतन आणि चित्रीकरण करणे हाही यामागील उद्देश आहे.

या अंतर्गत नुकतेच पुणे जिल्ह्यातील विविध कलाकारांच्या आणि संतांच्या भेटी महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक तेजल पात्रीकर,अनिमिष नाफडे आणि विनयकुमार यांच्या अभ्यासगटाने घेतल्या.महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने चिन्मय मिशनचे प्रमुख स्वामी तेजोमयानंद यांची त्यांच्या आश्रमात भेट घेतली त्यावेळी त्यांचा सन्मान करण्यात आला.त्यांनी या कार्याला आशीर्वाद दिले.

महाराष्ट्रभूषण आणि बासरीवादक पं.केशव गिंडे,पखवाज वादक माणिक मुंडे यांच्या भेटीत त्यांनी त्यांचा साधना प्रवास उलगडून दाखवला.तालयोगी पं.सुरेश तळवलकर आणि पद्माताई तळवलकर यांचीही भेट झाली. पं.सुरेश तळवलकर म्हणाले की सांगीतिक गुरूंचे सोबतच आध्यात्मिक गुरुही असणे आवश्यक आहे.प्रसिद्ध शास्त्रीय गायक पं.रघुनंदन पणशीकर यांनी संगीताच्या माध्यमातून विविध योग पद्धतींचा अभ्यास आणि गुरू गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या आठवणींना उजाळा दिला.

पं.विकास कशाळकर यांनी संगीत चिकित्सा पद्धती आणि त्यातील अनुभव कथन केले. तबलावादक पं.अरविंद कुमार आझाद यांनी बनारस घराण्याच्या वादन शैलीची वैशिष्ट्ये आणि गुरू पं.किशन महाराज यांची अज्ञात वैशिष्ट्ये कथन केली.सुप्रसिद्ध धृपद गायक पं.उदय भवाळकर म्हणाले की, गुरू कधीच मरत नाही, तो शिष्यांच्या रूपात तत्त्व बनून अमर असतो. माझ्या गुरुंनी त्यावेळी शिकवलेल्या कित्येक गोष्टी आजही नव्याने उलगडतात.

बासरी वादक रोणू मुझुमदार म्हणाले की कलाकाराचा प्रवास अलंकारापासून आरंभ होतो आणि शेवट अहंकाराने होतो. दुर्मिळ असे जलतरंग वाद्य वाजवणारे पं.मिलिंद तुळाणकर यांनी त्यांच्या आजोबांपासून प्रेरणा घेतली. नामशेष होत चाललेली ही विद्या जपण्यासाठी त्यांनी इतर सर्व सोडून ती कशी जपली, त्यातून येणारे नाद साधनेसाठी पोषक कसे आहेत आणि त्यात त्यांनी केलेले संशोधन आणि बदल याबद्दल माहिती सांगितली. तसेच फरशी, पाईप इ.विविध गोष्टींच्या माध्यमातून आघाताने वादनही करून दाखवले. सुरेश आचरेकर यांनी पं.कुमार गंधर्व यांच्या आठवणी सांगितल्या.

नृत्यगुरू सुचेता भिडे- चापेकर,शमा भाटे,मनीषा साठे,नीलिमा आध्ये यांच्याही भेटी घेतल्या.पं.संजीव अभ्यंकर,राजेंद्र कुलकर्णी यांनी रियाजाचे महत्त्व विशद केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.