Pune : विभागीय आयुक्तांनी घेतला पिंपरी-चिंचवड महापालिका ‘कोरोना’ प्रतिबंधाबाबतचा आढावा

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि पूर्वकाळजी व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंदर्भात प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेकडून सुक्ष्म नियोजन केले जात आहे. नागरिकांनी घाबरुन जावू नये, मात्र, पूर्वकाळजी घ्यावी. प्रशासनाने वेळोवेळी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सहकार्य करावे आणि या आपत्तीचा एकजुटीने सामना करावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले.

कोरोनाबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाकडून सुरू असलेल्या उपाययोजनांचा विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी आज, मंगळवारी (दि. 17) आढावा घेतला. यावेळी पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख, जिल्हा शल्यचिकीत्सक अशोक नांदापूरकर, महापालिकेच्या सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, ज्या नागरिकांना होम क्वॉरंटाईन सांगितले आहे, त्यांनी स्वत:हून घरी राहून स्वत:बरोबरच इतरांचीही काळजी घ्यावी. तसेच त्यांच्या डाव्या हातावर शिक्का मारावा. ज्यामुळे समाजात या व्यक्ती वावरताना आढळल्यास त्यांची ओळख पटेल. बाधित प्रवाशी आढळल्यास त्यांच्या प्रवासाची माहिती, त्यांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती विचारपूस करणा-या पथकाने तातडीने घ्यावी. तसेच परदेशातून प्रवास करुन आलेले व ज्यांना बाधा झाली, अशा प्रवाशाच्या संपर्कात आलेल्या निकटवर्तीयांची तपासणी करावी.

शहरातील बसस्थानक, रेल्वेस्थानक तसेच सार्वजनिक ठिकाणे येथे गर्दी नियंत्रण करताना महानगरपालिकेच्या वतीने व्यापक प्रमाणावर जनजागृती करावी. स्थानिक पातळीवर महापालिका प्रशासनाने नागरिकांमध्ये कोरोना आजाराविषयी असलेली भीती दूर करण्यासाठी जागृती करावी. कोरोना प्रतिबंधासाठी कार्यरत असलेल्या प्रत्येक अधिकारी, कर्मचारी, आरोग्य सेवेसाठी कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांना आवश्यक असलेले प्रशिक्षण तातडीने द्यावे. कोरोना प्रतिबंधाबाबत उपाययोजनासंदर्भात प्रत्येक अधिका-याने समन्वय ठेवून काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

कोरोना प्रतिबंधासाठी तयार करण्यात आलेल्या प्रत्येक पथकाचे कामकाज व जबाबदा-या याबाबत सविस्तर माहिती विभागीय आयुक्तांनी घेतली. पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

  • बुधवारपासून विमानाने आलेल्या सर्व प्रवासी राहणार 24 तास देखरेखीखाली
    बुधवार (दि. 18) पासून विमानाने येणा-या सर्व प्रवाशांना 24 तास देखरेखीखाली ठेवले जाणार आहे. त्यासाठी परिपूर्ण व्यवस्था काळजीपूर्वक करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.