Pune : चाळीस फूट खोल विहीरीमध्ये पडलेल्या श्वानांची अग्निशामक दलाच्या जवानांकडून सुटका

एमपीसी न्यूज- चाळीस फूट खोल विहीरीमध्ये पडलेल्या एक स्त्री जातीच्या श्वानांला अग्निशामक दलाच्या जवानांनी सुखरूपपणे बाहेर काढून सुटका केली. ही घटना मंगळवारी (दि. 9) गुरवार पेठेतील नाईक वाड्यात घडली.

मंगळवारी दुपारी बारा वाजता अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाकडे गुरुवार पेठेतील नाईक वाड्यात असलेल्या 40 फूट खोल विहीरीमध्ये एक स्त्री जातीचे श्वान पडले असून त्याची 5 पिल्ले ही जवळपास असल्याची वर्दी मिळाली. तातडीने क्षणातच अग्निशमन मुख्यालयातून बचाव पथक रवाना झाले.

तिथे घटनास्थळी पोहोचल्यावर जवानांनी विहीरीमध्ये सुमारे 35 फूट खोल पाण्यामध्ये श्वानाच्या ओरडण्याचा आवाज एेकला पण सुदैवाने ती 5 पिल्ले पाण्याबाहेर असल्याचे त्यांनी पाहिले. लगेचच जवान प्रकाश शेलार यांनी एका मुक्या प्राण्याचा जीव व सोबतच त्या पिल्लांची दशा पाहून दोरीच्या साह्याने खाली विहीरीमधे उतरण्याचे ठरवून ते चक्क त्या विहीरीमध्ये उतरले. जवान शेलार यांनी त्या पाण्यातील श्वानाच्या जवळ जात भेदरलेल्या श्वानाला रस्सीच्या मदतीने योग्यप्रकारे बांधून इतर जवानांना वर ओढण्यास सांगितले व स्वत: शेलार विहीरीतून बाहेर आले. या सुटकेकरिता तीस मिनिटाचा अवधी लागला.
श्वान बाहेर येताच ती पिल्ले त्यांच्या आईकडे धाव घेत तिला बिलगले. हे सर्व मायेचे चित्र पाहून व जवान प्रकाश शेलार यांनी बजावलेले तत्परतेचे कौतुक जमलेल्या नागरिकांनी करत आभार मानले.

या कामगिरीमधे अग्निशमन मुख्यालयातील वाहनचालक नवनाथ मांढरे तसेच जवान प्रकाश कांबळे, शफिक सय्यद, राजेश घडशी यांनीही सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.