Pune: देवदासी व देहविक्रय करणाऱ्या महिलांना पंधरा हजारांचे अर्थसहाय्य करा : राहुल डंबाळे

Pune: Donate Rs 15,000 to Devadasi and prostitutes: Rahul Dambale : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले निवेदन

एमपीसी न्यूज : ‘कोरोना’चा सर्वाधिक फटका बसलेल्या व समाजातील दुर्लक्षित घटक असलेल्या देवदासी आणि देहविक्रय करणाऱ्या महिलांना शासनाने पंधरा हजार रुपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणी रिपब्लिकन युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल डंबाळे, महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा सुवर्णा डंबाळे आणि पिंपरी चिंचवड शहर सरचिटणीस अमोल डंबाळे यांनी केली आहे.

त्याचबरोबर या समाज घटकाला सावरण्यासाठी सरकारने त्यांना विविध  सवलती लागू करण्याची मागणीही या संघटनेकडून करण्यात आली आहे.

यासंदर्भात संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राहूल डंबाळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविले आहे.

त्यात म्हटले आहे की, Covid-19 अर्थात कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावामुळे संपुर्ण जग व भारतासह महाराष्ट्र राज्यामध्ये मार्च महिन्यापासून संपूर्ण लॉकडाऊन सुरू आहे. या कालावधीत जास्तीत जास्त घटकांना सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून अनेक सोयी व सवलती देण्याचा शासन प्रयत्न करीत आहे.

या महाभयंकर कोरोनाचा सर्वाधिक फटका देवदासी तसेच देहविक्रय करणाऱ्या महिलांना बसलेला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

तसेच या पुढील कालावधीमध्ये आणखीन काही महिने, वर्षासाठी त्यांच्यावर उपासमारीची वेळ राहणार आहे. ही बाब निश्चितच अस्वस्थ करणारी आहे.

मुळातच परिस्थितीने या माता, माऊली यांना अत्यंत वाईट वळणावर उभे केलेले असताना हा नसर्गिक प्रकोप त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यांच्याकडे उत्पन्नाचे अन्य कोणतेही साधन नसल्यामुळे त्यांच्या सर्वांगीण जबाबदाऱ्या आता सरकार म्हणून आपल्यालाच पार पाडाव्या लागतील ही बाब आपण स्वीकारायला हवी.

त्यामुळे देवदासी व देहविक्री करणाऱ्या सर्वच महिलांना विनाविलंब पंधरा हजार रुपये शासकीय अर्थसहाय्य देण्यात यावे.

पुढील महिन्यापासून किमान आठ महिन्यांसाठी प्रतिमहा सात हजार रुपये पेन्शन योजना लागू करावी, या महिलांचे घराचे विज बिल, व मुलांचे शैक्षणिक शुल्क पूर्णता माफ करावे, त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांचा आरोग्यविषयक खर्चाचा भार सरकारने उचलावा.

तसेच या महिलांना व त्यांची कुटुंबियातील एका सदस्य कायमस्वरूपी रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष उपाययोजना करावी, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

या निवेदनाच्या प्रति उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.