Pune : पुणेकरांनो, घाबरून जाऊ नका, ‘कोरोना’ही बरा होऊ शकतो; ‘डिस्चार्ज’ मिळालेल्या ‘त्या’ रुग्णांची माहिती

एमपीसी न्यूज – पुणेकरांनो घाबरू नका, काळजी घ्या, शासनाला सहकार्य करा, डॉक्टरांच्या उपचारांनी ‘कोरोना’सुद्धा बरा होऊ शकतो, अशी दिलासादायक माहिती आज ‘डिस्चार्ज’ मिळालेल्या आणि घरी सोडलेल्या ‘त्या’ दोन रुग्णांनी दिली.

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव जीवघेणा असला तरी सर्व नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. शासनाने दिलेल्या सूचना पाळणे आवश्यक आहे. दिनांक ९ मार्च रोजी डॉ. नायडू रुग्णायात दाखल आम्ही उपचारासाठी दाखल झालो होतो. येथील वातावरण, सुविधा उत्तम आहे. केले जाणारे उपचार व रुग्णांची घेतली जाणारी काळजी उत्कृष्ट आहे. डॉक्टरांनी केलेल्या सूचनांचे योग्य पालन केले. त्यामुळेच आम्ही या निदानातून बरे झालो.

आज आनंदाने घरी जात असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. नायडू रुग्णालयातून हे रुग्ण जेव्हा घरी जाण्यासाठी बाहेर पडले, त्यावेळी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, नर्सेस या सर्वांनी त्यांना उल्हासपूर्ण, आनंददायी, भावपूर्ण वातावरणात टाळ्या वाजवून निरोप दिला.

हे दोन ‘कोरोना’बाधित रुग्ण बरे झाल्याची घटना अत्यंत दिलासा देणारी आहे. सध्याच्या तणावाच्या वातावरणात पुणेकरांना एक महत्वाचा संदेश देणारी असल्याची प्रतिक्रिया महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली.

कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत पुणे महापालिका पुणेकरांच्या सहाय्याने लढा देत आहे. अद्यापही हा लढा चालू असून हा लढा संपलेला नाही. पंतप्रधान, मुख्यमंत्री तसेच केंद्र शासन, राज्य शासनाकडून वेळोवेळी नागरिकांना सूचना देण्यात येत आहे. संचारबंदी व लॉकडाऊनच्या कालावधीत नागरिकांनी नियमांचे, सूचनांचे पालन केले पाहिजे. त्यामुळे सर्वांनी घरीच राहणे योग्य आहे. त्यामुळे कोरोना विषाणूंची साखळी तोडण्यात आपण सर्वजण यशस्वी होऊ.

डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयातील दोन रुग्णांची चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना देण्यात आलेला डिस्चार्ज देऊन घरी पाठविण्यात आले, ही महाराष्ट्रातील पहिलीच दिलासा देणारी घटना आहे. महापालिका आयुक्त शेखर गायकवाड आणि अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनीही हे रुग्ण बरे झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.