Pune : कोरोनाच्या संकट काळात तरी राजकारण करू नका : महापौर

शिवसेना - काँग्रेस - राष्ट्रवादीच्या शहाराध्यक्षांना आवाहन

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या संकट काळात तरी राजकारण करू नका, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहाराध्यक्षांना केले आहे. राज्यात तुमचे महाविकास आघाडीचे सरकार असताना मागील 40 दिवसांत तुमच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी का बोलले नाही? असा सवालही महापौरांनी या तिन्ही पक्षांच्या शहराध्यक्षांना विचारला आहे.

राज्य शासनाच्या आदेशानुसारच पुण्यातील लॉकडाउन शिथिल करण्यात आले आहे. त्याला मी विरोध केला. मात्र, पुणे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त हे राज्य शासनाच्या आदेशानुसार काम करीत आहेत. लॉकडाउन शिथिल केल्याने आज पुण्यात लाखो लोक रस्त्यावर आले आहेत. त्यासंदर्भात आपण राज्य शासनाशी का बोलत नाही, असा प्रश्न महापौरांनी उपस्थित केला आहे.

ते पुढे म्हणाले, मी स्वतः महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, पुणे विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त यांच्याशी सातत्याने संवाद साधत आहे. दोनच दिवसांपूर्वी आयुक्त चांगले काम करीत नाही. त्यामुळे पुण्यात कोरोना वाढत आहे. आयुक्तांना तातडीने राज्य शासनाच्या सेवेत परत बोलविण्याची मागणी या तिन्ही पक्षांच्या गटनेत्यांनी केली होती. मग आता आयुक्त चांगले काम करीत असल्याचे त्या पक्षांचे शहाराध्यक्ष कसे सांगत आहे, असा सवालही महापौरांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, बुधवारी शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आणि आमदार चेतन तुपेपाटील यांनी महापालिकेत पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये महापौर आणि आयुक्त यांच्यामध्ये समन्वय नसल्याची टीका केली होती. झोपडपट्ट्यात मोठ्या प्रमाणात कोरोना वाढत असताना योग्य त्या उपाययोजना करण्यात येत नाहीत. महापौर ट्विटरवर केवळ टीवटीव् करीत असल्याचा आरोप केला होता. त्याला महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.