Pune : डॉ. चंदनवाले रात्रंदिवस चांगले काम करतात, त्यांची बदली रद्द करा : रुग्णालय कर्मचाऱ्यांनी मागणी

एमपीसी न्यूज : ससूनचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांचा गुरुवारी अचानक पदभार काढून त्यांच्याजागी उप अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी नियुक्ती करण्यात आली. मात्र, अचानक घडलेल्या या बदली नाट्यानंतर रुग्णालय कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्याप्रमाणात नाराजी पसरली.  रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका यांनी पुण्याच्या विभागीय आयुक्तांची भेट घेत डॉ. चंदनवाले रात्रंदिवस चांगले काम करतात, त्यांची बदली रद्द करा, अशी मागणी केली.

पुणे शहरातील ससून रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे सांगत काही राजकीय मंडळींनी ससूनचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांच्याकडील अधिष्ठाता पदाचा कार्यभार काढून घेण्याची मागणी राज्यसरकारकडे केली होती.

त्यामुळे काल ( गुरुवारी) डॉ. अजय चंदनवाले यांचा पदभार काढण्यात आला. तसेच त्यांनी मुंबईतील वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या सह संचालक पदाचा पदभार तात्काळ सांभाळावा, असा आदेश वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे सह सचिव शिवाजी पाटणकर यांनी दिला.

तर ससूनचे अधिष्ठातापदी याच रुग्णालयाचे उप अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांची नियुक्ती करण्यात आली. डॉ. तांबे हे पदभार स्वीकारण्याआधी आजारी पडले व रजेवर गेले.

मात्र, डॉ. चंदनवाले यांच्या बदलीला आता ससूनमधील डॉक्टर आणि परिचारिकांनी विरोध दर्शविला आहे. मार्डच्या नेतृत्वाखाली या डॉक्टर आणि परिचारिकांनी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडे डॉ. चंदनवाले यांच्या बदलीचा निषेध केला.

तसेच डॉ. चंदनवाले रात्रंदिवस चांगले काम करतात, त्यांची बदली रद्द करा, अशी मागणी केली. त्यामुळे आता या प्रकरणी विभागीय आयुक्त  काय निर्णय घेणार आणि डॉ. चंदनवाले यांची बदली रद्द होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.