Pune: निसर्गाचा समतोल मानवी हस्तक्षेपामुळे बिघडत आहे – डॉ. प्रकाश आमटे

एमपीसी न्यूज – वन्यप्राण्यांचे संवर्धन झाले पाहिजे, त्यांना देखील प्रेमाची भाषा कळते, मात्र मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गाचा समतोल ढासळत आहे. त्यातून प्राण्यांना हानी पोहचत आहे. सहवासातून प्रेम निर्माण होत असून वन्यप्राण्यांनी दिलेलं प्रेम आणि विश्वास याची तुलना कोणाशीही होऊ शकत नसल्याचे मत जेष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी आज (रविवारी) पुण्यात एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात व्यक्त केले.

 

राजहंस प्रकाशनतर्फे टेरी इरविन लिखित मूळ पुस्तकाचे सोनिया सदाकाळ-काळोखे यांनी मराठीमध्ये अनुवादित केलेल्या “स्टिव्ह आणि मी” या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते पार पडले, त्यावेळी डॉ. प्रकाश आमटे बोलत होते.

 

निसर्गामध्ये राहिल्यामुळे आमचे आयुष्य समृध्द झाले, त्यामध्ये आम्हाला अनेक चांगले आणि वाईट अनुभव आले. प्राण्यांबद्दल प्रेम निर्माण करणे आणि निसर्गाबद्दल आस्था निर्माण व्हावी यासाठी काम झाले पाहिजे. तरुणांमध्ये जर त्यांच्याबद्दल प्रेम निर्माण झाले आणि त्यांचे महत्व कळाले तर आपोआपच ते निसर्ग संवर्धनासाठी पुढाकार घेतील. भिती घालणं हा मनुष्य स्वभाव आहे. भितीतूनच अंधश्रद्धा निर्माण होतात. त्याच अंधश्रद्धेतून वन्यप्राण्यांचे हकनाक बळी जात असल्याची खंत यावेळी डॉ. आमटे यांनी व्यक्त केली.

 

प्रकाशन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे जेष्ट साहित्यिक, पानीपतकार विश्वास पाटील, डॉ. मंदाताई आमटे, नाट्य दिग्दर्शिका आरती गोगटे, संपादक डॉ. सदानंद बोरसे, प्रकाशक दिलीप माजगांवकर, रेखा माजगावकर वीणा देव,चित्रलेखा पुरंदरे, आदी मान्यवर उपस्थित होते.

 

विश्वास पाटील म्हणाले की, प्राण्यांनी माणसाचे आयुष्य सुरुवातीपासून  सुकर केले आहे. आज गल्लीबोळामध्ये प्राणीमित्र  निर्माण झाले आहे, परंतु केवळ आपल्या शेजारी सापडलेला साप जंगलात नेऊन सोडणे इतकेच आपले काम राहिले आहे का याचाही विचार झाला पाहिजे. प्राणीमित्र म्हणून यापेक्षा अधिक व्यापक काम झाले पाहिजे.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिनेअभिनेत्री शर्वरी जमेनीस यांनी केले तर सचिन काळोखे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.